कृत्रिम तलावातील गणेशमूर्ती विसर्जनात तब्‍बल ५७.७६ टक्‍के वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

‘कोविड-१९’ च्‍या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्‍या यंदाचा गणेशोत्‍सव साधेपणाने करावा; तसेच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन हे प्राधान्‍याने कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना केले होते. या आवाहनाला मुंबईकरांनी अतिशय चांगला प्रतिसाद देत, नागरिकांनी दीड दिवसांच्या गणपतीचे कृत्रिम तलावात विसर्जन केले. गेल्‍यावर्षीच्‍या तुलनेत कृत्रिम तलावांमध्‍ये श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍याच्‍या टक्‍केवारीत यंदा तब्‍बल ५७.७६ टक्‍कयांची वाढ नोंदविण्‍यात आली आहे.

हेही वाचाः- महाराष्ट्रात ई-पासबाबतचे नियम कायम, गृहमंत्र्यांनी केला खुलासा

यंदाच्‍या गणेशोत्‍सवात दरवर्षीप्रमाणे मोठया मिरवणूका नव्‍हत्‍या, ध्‍वनी प्रदूषण- वायू प्रदूषण देखील तुलनेने कमी असल्‍याचे जाणवत होते. दरवर्षी अनुभवायला येणारी वाहतूक कोंडी देखील यंदा नव्‍हती. तर समुद्र-तलाव-खाडी इत्‍यादी ठिकाणी महापालिकेने केलेल्‍या आवाहनानुसार स्‍वत: श्रीगणेशमूर्तीं विसर्जनासाठी न जाता आपल्‍या बाप्‍पाच्‍या मूर्तीचे विसर्जन हे महापालिकेच्‍या कर्मचारी/स्‍वयंसेवक यांच्‍याव्‍दारे केले. त्‍याचबरोबर दरवर्षीच्‍या तुलनेत यंदाचे दीड दिवसाचे विसर्जन अधिक लवकर व वेळेत संपन्‍न झाले. गेल्‍यावर्षी ३ सप्‍टेंबर, २०१९ रोजी कृत्रिम तलावांमध्‍ये १४ हजार ४९० एवढया दीड दिवसांच्‍या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍यात आले होते. यंदा या संख्‍यात लक्षणीय वाढ झाली असून महापालिकेने तयार केलेल्‍या कृत्रिम तलावांमध्‍ये २२ हजार ८५९ एवढया श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍यात आले. त्‍याचबरोबर आपल्‍या बाप्‍पाला घरी किंवा सोसायटीमध्‍ये निरोप देणाऱ्या नागरिकांची ही संख्‍या यंदा मोठी होती. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने केलेल्‍या आवाहनाला आणि दिलेल्‍या सूचनांना मुंबईकरांनी अतिशय सकारात्‍मक प्रतिसाद दिल्‍या बद्दल बृहन्‍मुंबई महापालिका प्रशासनाने नागरिकांचे आभार मानले आहेत.

हेही वाचाः- सुशांत आत्महत्या प्रकरण: कुछ तो गडबड है !  AIIMS फॉरेन्सिक प्रमुखांचा दावा

गेल्‍यावर्षी म्‍हणजेच ०३ सप्‍टेंबर २०२० रोजी एकूण ६१ हजार ९३० श्रीगणेशमूर्तींचे विसर्जनकरण्‍यात आले होते; यामध्‍ये ६१ हजार ७२९ घरगुती, तर २०१ सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचा समावेश होता. यापैकी कृत्रिम तलावात विसर्जन करण्‍यात आलेल्‍या श्रीगणेशमूर्तींची संख्‍या ही गेल्‍यावर्षी १४ हजार ४९० इतकी होती. यामध्‍ये १४ हजार ४४२ घरगुती, तर ४८ सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचा समावेश होता.  यंदा दीड दिवसांच्‍या श्रीगणेशमूर्तींची संख्‍या ४० हजार ८२३ येवढी होती; ज्‍यामध्‍ये ३९ हजार ८४५ घरगुती, तर ९७८ सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचा समावेश होता. यापैकी कृत्रिम तलावामध्‍ये विसर्जित करण्‍यात आलेल्‍या श्रीगणेशमूर्तींची संख्‍या २२ हजार ८५९ इतकी होती. यामध्‍ये २२ हजार १४९ घरगुती, तर ७१० सार्वजनिक श्रीगणेशमूर्तींचा समावेश होता. यंदा बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने १६८ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्‍यवस्‍था केली आहे. त्‍याचबरोबर नागरिकांनी शाडूमातीच्‍या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन हे आपल्‍या घरच्‍या किंवा सोसायटीच्‍या स्‍तरावर करण्‍याचे आवाहन केले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या