औद्योगिक जमिनीवर निवासी इमारती बांधून बहुराष्ट्रीय 'एल अँड टी' कंपनीने शासनाचा महसूल बुडवल्याने, कंपनीचे संचालक आणि पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (शहरे) रणजित पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. त्यामुळे या कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत.
शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी या कंपनीच्या गैरव्यवहारासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर सभागृहात चर्चा होत असताना काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी हा आरोप केला आहे.
ते म्हणले, या कंपनीने कमाल जमीनधारणा कायद्याचा भंग केला आहे. कंपनीने औद्योगिक कारणासाठी शासनाकडून जमीन घेतली. पवई इथल्या जागेवर या कंपनीने महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडून परस्पर परवानगी घेऊन अनधिकृत निवासी बांधकाम केले. यासाठी कंपनीने कमाल जमीन धारणा कायद्याचाही भंग केला असून, 24 मजल्यांचे 10 टॉवर बांधल्याची माहिती नसीम खान यांनी दिली.
या कंपनीने नियम धाब्यावर बसवून सुमारे 400 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोपही आमदार नसीम खान आणि सुनील प्रभू यांनी केला. यावर सरकारने काय कारवाई केली? अशी विचारणा करत सभागृहात आमदारांनी गोंधळ घातला.
या कंपनीच्या बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल असे उत्तर गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांनी दिले.
हेही वाचा -