‘एल अँड टी’साठी महापालिका आयुक्तांची वकिली!

  BMC
  ‘एल अँड टी’साठी महापालिका आयुक्तांची वकिली!
  मुंबई  -  

  पवईत 'लार्सन अँड टुब्रो'(एल अँड टी) कडून कापण्यात येणाऱ्या 275 झाडांची पुन्हा एकदा पाहणी करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. मात्र, ‘एल अँड टी’मधील झाडे कापणे आवश्यक असल्याचे सांगत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ही कंपनी मोठी असून यामुळे लोकांना रोजगार मिळेल, असेही सांगण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला. परंतु काँग्रेसने घेतलेल्या विरोधाच्या भूमिकेमुळे अखेर आयुक्तांना शिवसेनेची पाहणी करण्याची मागणी मान्य करत हा प्रस्ताव राखून ठेवावा लागला.

  कंपनीची प्रशासकीय इमारत बनविण्यासाठी पवईतील तुंगा आणि पासपोली गाव परिसरातील तब्बल 275 झाडांवर 'लार्सन अँड टुब्रो' (एल अँड टी) कुऱ्हाड चालवणार आहे. ‘एल अँड टी’ने या ठिकाणची झाडे यापूर्वी अनधिकृतपणे कापण्यास सुरुवात केली होती. परंतु, याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर आता त्यांनी महापालिकेकडे झाडे कापण्यासाठी परवानगी मागितली आहे. या परवानगीत त्यांनी 83 झाडे कापण्याचा आणि 192 झाडे पुनर्रोपित करण्यासाठीचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीपुढे ठेवला आहे. याविरोधात पोलिस तक्रार दाखल झालेली असतानाच ही झाडे कापण्यासाठी परवानगी मागितली हे विशेष.


  झाडांची पाहणी करण्यावर शिवसेना ठाम -

  या प्रस्तावावर सभागृह नेते यशवंत जाधव यांनी या झाडांची पाहणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वीच्या महापालिकेतील सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव, रमेश कोरगावकर, तत्कालीन विरोधी पक्षनेते बाळा आंबेरकर, राष्ट्रवादीचे धनंजय पिसाळ, मनसेच्या अनिषा माजगावकर यांनी झाडांची पाहणी करुन कापण्यास अनुमती दर्शवली होती. त्यामुळे वृक्षप्राधिकरणाचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या झाडांची पुन्हा पाहणी करण्याची गरज नसल्याचे सांगितले.


  हेही वाचा - 

  झाडांच्या कत्तलीसंदर्भातील तक्रारींसाठी न्यायमूर्तींची समिती स्थापन  झाडे कापण्यास काँग्रेसचा विरोध -

  मात्र, शिवसेना यावर ठाम राहिली आणि काँग्रेसनेही या झाडांची कत्तल करण्यास आपला विरोध दर्शवला. ,‘एल अँड टी’ मधीलच काय, तर यापुढे मुंबईतील एकही झाड कापण्यास दिले जाणार नसून या वृक्षप्राधिकारणातील प्रत्येक झाड कापण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध राहील, असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यावेळी स्पष्ट केले.


  ...तर भाजपा अनुकूल -

  येथील झाडे कापण्यास पहारेकरी असलेले भाजपा अनुकूल आहे. ही झाडे कापली जावी, अशी भूमिका आयुक्तांनी मांडली. ही सर्वांत मोठी कंपनी आहे आणि यामुळे लोकांना रोजगार मिळू शकेल, अशा प्रकारे आयुक्तांनी आपली बाजू मांडली. त्यामुळे विकासाच्या मुद्दयावर आपण पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती, असे भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी स्पष्ट केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.