अंधेरी, बदलापूर स्थानकातील पादचारी पूल धोकादायक

रेल्वे प्रशासनाने केलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये अंधेरी स्थानकातील एमसीजीएम पादचारी पूल आणि बदलापूर स्थानकातील मध्य पादचारी पूल धोकादायक स्थितीत आढळून आले आहेत. त्यामुळे हे पादचारी पूल डागडुजीसाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. परिणामी या स्थानकांतील रेल्वे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

अंधेरीचा पूल ९० दिवस बंद

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकातील एमसीजीएम पादचारी पूल ६ ऑगस्टपासून ते ३ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा पादचारी पूल बंद करण्यात येणार आहे. यादरम्यान प्रवाशांनी अंधेरी स्थानकातील उत्तरेकडील पुलाचा वापर करावा, असं पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

बदलापूरचा पूल १ महिना बंद

मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकातील प्लॅटफाॅर्म क्रमांक १, २ आणि ३ नंबरला जोडणारा मध्य पादचारी पूल बंद करण्यात येणार आहे. हा पूल ९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत बंद राहणार आहे. यादरम्यान स्थानकातील इतर पादचारी पुलांचा वापर करण्याची विनंती मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.

अंधेरीतील गोखले पूल दुर्घटना घडल्यानंतर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईतील रेल्वे हद्दीतील ४४५ पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रेल्वे आणि महापालिकेने संयुक्तपणे पुलांची पाहणी सुरु केली आहे. या पाहणीत लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक स्थितीत आढळून आल्याने तो पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर इतर जुन्या पुलांची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कल्याणचा पत्री पूलही पाडणार

रेल्वे, आयआयटी आणि केडीएमसीने केलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये कल्याणचा पत्री पूल धोकादायक असल्याचं आढळून आलं. त्यामुळे हा पूल वाहतुकीस बंद करून तो पाडण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. तूर्तात पूल पाडण्याची तारीख ठरवण्यात आलेली नाही.


हेही वाचा-

मुंबईतील ३८३ सार्वजनिक शौचालये धोकादायक!

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी नेमला तिसरा सल्लागार


पुढील बातमी
इतर बातम्या