Advertisement

…तर मुंबईतील आणखी उड्डाणपूलही बंद?

लोअर परळप्रमाणेच मुंबईतील उर्वरीत पाचही उड्डाणपूल बंद करावे लागल्यास मुंबईत वाहतुकीसह रेल्वे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.

…तर मुंबईतील आणखी उड्डाणपूलही बंद?
SHARES

लोअर परळ उड्डाणपुलासह मुंबईतील दादर टिळक पूल, एल्फिन्स्टन पूल, करीरोड पूल, महालक्ष्मी पूल आणि बेलासीस पूल आदी सहा पूल अत्यंत जुने आणि धोकादायक बनलेले अाहेत. महापालिकेने नोव्हेंबर २०१६ ला रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुलांची दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे. 

पण २ वर्षांनंतर आता झोपी गेलेलं रेल्वे प्रशासन जागं झालं असून लोअर परळप्रमाणेच मुंबईतील उर्वरीत पाचही उड्डाणपूल बंद करावे लागल्यास मुंबईत वाहतुकीसह रेल्वे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.

 

प्रवाशांची गैरसोय 

मुंबईतील अंधेरी येथील उड्डाणपुलाला जोडून असणाऱ्या पादचारी पुलाचा भाग कोसळल्यानंतर रेल्वे हद्दीतून जाणाऱ्या सर्वच उड्डाणपुलांची तपासणी करून त्यांचं ऑडीट करण्यात येत आहे. मात्र, या सर्व पुलांचं ऑडीट सुरु असतानाच सार्वजनिक सुरक्षेसाठी हा पुल तात्काळ बंद करण्यात यावा आणि लवकरात लवकरात तो तोडण्यात यावा, अशी शिफारस आयआयटी संस्थेनं केली आहे. त्यानुसार लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुल मंगळवारी सकाळपासून बंद करण्यात आला. परिणामी या पुलावरून रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या - येणाऱ्या प्रवाशांना पुलाखालील मार्गाचा अवलंब करावा लागला. परिणामी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची तसेच लोकांची गैरसोय झाली होती.


अाणखी ५ पूल धोकादायक

लोअर परळ येथील उड्डाणपुल हा धोकादायक असल्याची शिफारस आयआयटीनं केली असली तरी या पुलासोबत करी रोड, एल्फिन्स्टन पूल, महालक्ष्मी पूल, दादर टिळक पूल आणि बेलासीस उड्डाणपूल हे पाच उड्डाणपुलही धोकादायक आहेत. त्यामुळे त्यांची त्वरीत दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेच्यावतीनं मागील दोन वर्षांपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पाठपुरावा सुरु आहे. परंतु आजवर महापालिकेच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवणाऱ्या रेल्वेने अचानकपणे लोअर परळचा पूल बंद करून मुंबईकरांची मोठी पंचाईत करून टाकली.

लगेच तोडणं अयोग्य

महापालिकेच्या पूल विभागाचे प्रमुख अभियंता शितला प्रसाद कोरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या पुलाच्या बांधकामासाठी रेल्वेच्या हद्दीत रेल्वे आणि महापालिकेच्या हद्दीत महापालिका बांधकाम करणार असल्याचं स्पष्ट केलं. आयआयटीनं सांगितलं म्हणून ते बंद करून त्यांचं तोडकाम करणं योग्य नसून ब्लॉक घेऊन याची टप्प्याटप्प्यात दुरुस्ती करायला हवी, असंही त्यांनी म्हटलं आहे.


२ वर्ष रेल्वेचं दुर्लक्ष

नोव्हेंबर २०१६ रोजी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची आपण स्वत: भेट घेऊन त्यांना लोअर परळसह करी रोड, एलफिन्स्टन पूल, महालक्ष्मी पूल, दादर टिळक पूल आणि बेलासीस उड्डाणपूल ही पाच उड्डाणपुलही धोकादायक आहेत, याची आठवण करून दिली. त्यामुळे या पुलांची दुरुस्ती हाती घेतली जावी, यासाठी लागणार निधी महापालिका आपल्याला देईल, असंही सांगितलं. पण २ वर्ष होत आली तरी रेल्वेने, महापालिकेच्या सूचनेकडं लक्ष दिलं नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. या पुलाची डागडुजी करून नवीन पुलाचं बांधकाम होईपर्यंत त्यांचा वापर करता येवू शकतो, असं सांगत या पुलाची दुरुस्ती त्वरीत हाती घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं.



हेही वाचा -

अंधेरीतील ‘पोस्ट हाऊस’ स्टुडिओवर पालिकेचा हातोडा

 माटुंगा स्थानकाचंही नाव बदलण्याची मागणी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा