दहिसरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर अॅसिड हल्ला

दहिसरमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने त्याच्याच शेजारी राहणाऱ्या तरुणीवर अॅसिड हल्ला केला. यामध्ये तरुणी गंभीररित्या जखमी झाली आहे. उपचारासाठी तिला कांदिवलीतल्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहिसरमध्ये राहणारी तरुणी शनिवारी रात्री साडेदहा वाजता काही कामानिमित्त घराबाहेर पडली. तोच तिच्या शेजारी राहणाऱ्या 25 वर्षाच्या हेमंत देवकुले या तरुणाने तिच्यावर अॅसिड फेकले. त्यावेळी तिने आरडाओरड करताच काही लोक तिथे आले आणि आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत जखमी तरुणीला शताब्दी रुग्णालयात दाखल केले.

दहिसर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक वसंत पिंगळेंनी दिलेल्या माहितीनुसार, त्या तरुणाचे त्याच्याच शेजारी राहणाऱ्या तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. हा तरुण त्या तरुणीशी नेहमी बोलण्याचा प्रयत्न करत असे, पण तरुणीने दुर्लक्ष केल्याने रागाच्या भरात त्याने तिच्यावर अॅसिड हल्ला केला.


हेही वाचा - 

एकतर्फा प्रेमापोटी अॅसिड हल्ला

कुटुंबावर अॅसिड हल्ला, तीन जखमी

पुढील बातमी
इतर बातम्या