गोरेगावमध्ये तरूणीचा प्रियकरावर अॅसिडहल्ला

 Goregaon
गोरेगावमध्ये तरूणीचा प्रियकरावर अॅसिडहल्ला
Goregaon , Mumbai  -  

मागील काही वर्षांमध्ये एकतर्फी प्रेमातून किंवा आसुयेपोटी तरूणांनी महिलांवर अॅसिड हल्ला केल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या आहेत. परंतु गोरेगावमध्ये चक्क एका तरूणीनेच आपल्या प्रियकरावर अॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात ओमसिंह सोलंकी हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीरा शर्मा (26) असे आरोपी तरूणीचे नाव असून ती नालासोपारा येथे राहणारी आहे. मीरा सध्या फरार असून गोरेगाव पोलीस तिचा शोध घेत आहेत.

ओमसिंह सोलंकी याचे मीरा शर्मासोबत प्रेमसंबध होते. मात्र अलिकडच्या काळात त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. ओमसिंह मीराला भेटण्याचे तसेच तिच्यासोबत बोलण्याचे टाळत असल्याने मीराचा राग अनावर झाला. या रागातूनच तिने गुरुवारी संध्याकाळी एम.जी. रोड परिसरात ओमसिंहला गाठले आणि त्याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. दोघांमधील भांडण विकोपाला गेल्यावर मीराने ओमसिंहवर अॅसिड टाकले आणि ती तेथून पसार झाली.

या अॅसिड हल्ल्यात ओमसिंहच्या चेहऱ्याला तसेच डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Loading Comments