गाडी धुण्यास उशीर झाल्याने सुरक्षारक्षकाला मारहाण

गाडी धुण्यास उशीर झाला म्हणून रागाच्याभरात एका सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ज्यात तो गंभीररित्या जखमी झाला आहे. अंधेरी पश्चिम येथे सोमवारी हा प्रकार घडला असून याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्याला अटक केली जाणार असल्याचे आश्वासन देखील पोलिसांनी दिले आहे.

50 वर्षांचे तानाजी दत्तात्रय पवार हे जोगेश्वरी पश्चिमेच्या गणेशनगर परिसरात राहतात. ते अंधेरी पश्चिम येथील यमुनानगरच्या कृष्णा कावेरी बिल्डिंगमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करतात. याचबरोबर ते या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांच्या गाड्या देखील धुण्याचे काम करतात. 

ओशिवरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी त्यांना गाडी धुण्यासाठी थोडा विलंब झाला. त्यामुळे सोसायटीतील एका सदस्याशी त्यांची बाचाबाची झाली. हा वाद हाणामारीवर गेला. ज्यात पवार यांना बेदम मारहाण करण्यात आली.

त्यात त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया देखील करण्यात आली.

याप्रकरणी त्यांच्या घरच्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आम्ही याप्रकरणी सोसायटीच्या सदस्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र पवार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना हल्लेखोराबाबत नीट सांगता आलेले नाही. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच संबंधित व्यक्तीला अटक करू.

- सुभाष खानविलकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, ओशिवरा पोलिस ठाणे


हेही वाचा - 

बंदी बनवून केली मारहाण

डिस्चार्जला उशीर झाला म्हणून त्याने केली नर्सला मारहाण


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या