डिस्चार्जला उशीर झाला म्हणून त्याने केली नर्सला मारहाण


डिस्चार्जला उशीर झाला म्हणून त्याने केली नर्सला मारहाण
SHARES

रुग्णालयात दाखल न केल्यामुळे मनमाडमध्ये नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण...रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्यामुळे नाशिकमध्ये डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण...सांगितल्याप्रमाणे उपचार न केल्याचा दावा करत ठाणे जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण...गेल्या काही दिवसांमध्ये डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या या घटना...अशा मारहाणीविरोधात अनेकदा डॉक्टरांनी संप पुकारला आहे. त्यावर सरकारकडून डॉक्टरांच्या सुरक्षेचं आश्वासनही देण्यात आलं आहे. त्यासाठी मुंबईसह राज्यभरातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये सुरक्षा कर्मचारीही नेमण्यात आले आहेत. मात्र तरीही रूग्णालय कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना बुधवारी दुपारी कुर्ला पश्चिमेच्या आनंदीबाई प्रसुतीगृहात घडली आहे.


नक्की घडलं काय?

कुर्ल्याच्या बैलबाजार परिसरातल्या आनंदीबाई प्रसूतीगृहातली ही घटना. अफसाना नावाची एक महिला प्रसुतीसाठी 16 जूनला इथे अॅडमिट झाली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर 21 जूनला अर्थात बुधवारी या महिलेला सकाळी डिस्चार्ज मिळणार होता. मात्र अफसानाला डिस्चार्ज देत असतानाच आणखीन एक इमर्जन्सी केस समोर आली. त्यावेळी जेनिफर डाइस नावाच्या परिचारिकेने 'तुम्हाला अर्ध्या तासात डिस्चार्ज देते' असं सांगितलं. यावर अफसानाचा पती इमरान अकबर याने जेनिफरसोबत वाद घालायला सुरुवात केली. 'विनाकारण डिस्चार्ज देण्यासाठी उशीर केला जात आहे' असा दावा इमरानचा होता. हा वाद इतका वाढला की संतापाच्या भरात इमरानने थेट जेनिफरला मारहाण करायला सुरुवात केली.


हेही वाचा

दोघांच्या भांडणात, डॉक्टरांना मारहाण



काय झाली कारवाई?

याप्रकरणी जेनिफरने इमरानविरोधात साकीनाका पोलिसात मारहाणीची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी इमरानला अटक केली. साकीनाका पोलिस प्रवक्ता रश्मी करंदीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामात अडथळा आणि परिचारिकेबरोबर हुज्जत आणि प्रसंगी मारहाण केल्याप्रकरणी इमरानवर कलम 353, 332 आणि 504 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दोनच महिन्यांपूर्वी केईएम हॉस्पिटलमध्ये डॉक्टरवर एका रुग्णाने चक्क सर्जिकल ब्लेडने हल्ला केला होता. यामध्ये संबंधित डॉक्टर गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करुनही रुग्णांना वाचवणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचीच सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं चित्र निर्माण होऊ लागलं आहे. अशा घटनांमुळे काम करायचं तरी कसं आणि कुणाच्या भरवशावर? असा प्रश्न डॉक्टरांना पडणं अगदी साहजिक आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा