डॉक्टरांचा संप मिटला पण प्रश्न कायम

 Mumbai
डॉक्टरांचा संप मिटला पण प्रश्न कायम

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मीडियात चर्चेचे केंद्र ठरलेले डॉक्टरांचे संपपुराण सध्यापुरते तरी संपले आहे. अर्थात, पुन्हा कधी रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांना मारहाण करतील आणि पुन्हा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संप होऊन रुग्णांचे हाल होतील, याचा नेम नाही. परंतु, तात्पुरता तरी संपाचा हा तिढा सुटलाय एवढंच !

दरम्यान, डॉक्टरांनी संप पुकारल्यानंतर तीन दिवसांत 135 रुग्णांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी सांगते. अर्थात, याला जबाबदार डॉक्टर आहेत की नाही, यावर खल करण्यापेक्षा भविष्यात अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

महापालिका प्रशासन आणि सरकारचा दृष्टिकोन तर नेहमीप्रमाणेच डॉक्टरांना व्हिलन बनवण्याचाच राहिला. तर, न्यायालयानेही याप्रकरणी डॉक्टरांनाच झापल्याने प्रशासनाला दिलासा आणि मीडियाला ब्रेकिंग न्यूज मिळाली. परंतु, नीट विचार केला तर डॉक्टर किंवा त्यांची 'मार्ड' नामक संघटना अनेकदा चुकताना जाणवत असली तरी पूर्ण चूक त्यांचीच आहे, असे म्हणता येणार नाही. रुग्णालयांमधील वाढते रुग्ण, अस्वच्छता, रुग्णांना भेटण्यासाठी होणारी नको तेवढी गर्दी, त्यांना मिळणारी वागणूक, अपुरी साधने, रोगनिदानासाठी वाढत्या टेस्ट, खर्चिक औषधे आणि त्यांची उपलब्धतता इथपासून इतपर्यंत अनेक प्रश्नांना डॉक्टरांना कसे जबाबदार धरणार?

न्यायालयाने संप करू नका सांगितल्यानंतरही आडमुठेपणा दाखवणाऱ्या डॉक्टरांविषयी राग व्यक्त होणे स्वाभाविक आहे. परंतु, त्यांच्या या भूमिकेमागची कारणं शोधण्याची तसदी कुणीच घेताना दिसत नाही. वारंवार, मार्ड किंवा शिकाऊ डॉक्टरांच्या व्यथा सांगितल्यानंतरही कुणी त्यावर फारसा प्रकाशझोत टाकत नाही किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, असेच म्हणावे लागेल. वयाच्या तिशीनंतरही शिकत राहणारी डॉक्टर ही एक जमात यानिमित्ताने उपेक्षितच असल्याचे दिसते.

परंतु, त्याचवेळी डॉक्टरी व्यवसायाचे बदलते स्वरुपही नक्कीच चिंताजनक आहे. पूर्वी डॉक्टर म्हणजे देव असे सांगितले जायचे. घरातील शुभकार्यापासून विविध कार्यक्रमांमध्ये डॉक्टरांना मानाचे स्थान असे. डॉक्टर साहेबांच्या पत्नीलाही डॉक्टरीण बाईंचा मान देणारा आपला समाज आज त्याच डॉक्टरांवर हात उचलताना दिसतोय. अर्थात, यामागेही अनेक कारणे आहेतच ना! एकेकाळी सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या डॉक्टरकीला म्हणजेच वैद्यकीय क्षेत्राला धंदेवाईक कुणी बनवले? अर्थात सर्वच डॉक्टर धंदेवाईक बनलेत असा सरसकट आरोप नसला तरी हे प्रमाण निश्चितच चिंताजनक आहे.

या प्रकरणाची खरी व्याप्ती, खरे प्रश्न यात अधिक खोलात शिरत गेलो तर गर्तेत सापडण्याशिवाय काहीच हाती लागत नाही. रुग्णांच्या नातेवाईकांचा रुद्रावतार हा कधी निर्माण होतो? ज्याचे जळते त्यालाच कळते, असे म्हणतात. त्यामुळे एखाद्याचा माणूस गमावल्यानंतर दुःखाचा बांध फुटतो, तसाच रागही अनावर होऊ शकतो. परंतु, तो राग केवळ डॉक्टरवर नसतो तो व्यवस्थेवर असतो. डॉक्टर हे त्या व्यवस्थेचेच प्रतिनिधी म्हणून समोर असल्याने मार खातात. तेव्हा, डॉक्टरांना मारहाण ही व्यवस्थेविरोधातील नाराजी आहे, हे समजून घ्या आणि व्यवस्थेत तातडीने सुधारणा करा. अन्यथा, येत्या काळात डॉक्टरांबरोबरच प्रशासकीय अधिकारी-कर्मचारीही या नाराजीतून सुटणार नाही. आणि जेव्हा जनताच रस्त्यावर उतरेल तेव्हा न्यायालय कुणाला काय सांगत राहणार?

Loading Comments