मंत्रालयात पोलिसांच्या मोबाइलची चोरी, पोलिसांनी सुरक्षारक्षकांनाच केली मारहाण

 Mantralaya
मंत्रालयात पोलिसांच्या मोबाइलची चोरी, पोलिसांनी सुरक्षारक्षकांनाच केली मारहाण
Mantralaya, Mumbai  -  

महाराष्ट्राचे सत्ता केंद्र असलेल्या आणि 24 तास कडेकोट पहारा असलेल्या मंत्रालयात पोलिसांचेच मोबाइल चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांचेच तीन मोबाइल चोरीला गेल्यानंतरही पोलिसांनी मात्र असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे अगदी ठामपणे संगितले आहे. त्यामुळे असे म्हणण्यामागे पोलिसांचा काय हेतू असेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मंत्रालयाच्या समोर असलेल्या महात्मा गांधी उद्यानात रात्रीच्या वेळी पोलीस झोपतात. या उद्यानाच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहेत. गुरुवारी रात्री तिथे झोपलेल्या पोलिसांचे तीन मोबाइल आणि जवळपास 200 रुपये चोरीस गेले. या घटनेने सैरभैर झालेल्या पोलिसांनी सगळा राग तिथल्या खासगी सुरक्षारक्षकांवर काढला.

सुरक्षारक्षक अरविंद आरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्हा सुरक्षारक्षकांवर मोबाइल चोरीचा आळ घेत पोलीस  मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गेले आणि अनंत मोरे नावाच्या सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी पट्ट्याने मारहाण केली. मारहाण केल्यावर दोघांचेही नाव आणि पत्ता घेतल्याचं आरेकर पुढे म्हणाले.

विशेष म्हणजे एवढं होऊन सुद्धा मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात कोणताच गुन्हा दाखल नसल्याचं तसेच सुरक्षारक्षकांच्या मारहाण केल्याच्या वृत्ताचा पोलिसांनी नकार दिला आहे. त्यामुळे पोलिसांच्या बोलण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रालयच्या समोर असलेल्या डी वाईब नावाच्या दुकानात पाच महिन्यात चारदा चोरी झाल्याचा प्रकार मुंबई लाइव्ह ने दखवला होता.

Loading Comments