घाटकोपर परिसरात दारूसाठी पत्नीने पैसे दिले नाहीत म्हणून माथेफिरू पतीने पत्नीला जाळल्याची घटना शनिवारी घडली. यात रुबिना नासीर शेख या ३० टक्के भाजल्या असून त्यांना उपचारा करता सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी माथेफिरू नासीर इस्माइल शेख (२८) याला अटक केली आहे.
हेही वाचाः- फेक फाँलोओर्स प्रकरणी दोन बड्या मार्केटिंग कंपन्यांच्या अडचणीत वाढ, १० सेलिब्रिटी रडारवर
घाटकोपरच्या नित्यानंद नगर चाळीत रुबिना ही नासीरसोबत रहात होती. नासीर हा व्यसनाच्या आधीन गेल्याने तो घरीच रहायचा. तर रुबिनाच घरकाम करून पैसे जमवायची त्यावरच त्यांचे घर चालायचे. मात्र नशेसाठी नासीर हा रुबिनाला त्रास द्यायचा. यावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे. आधीच कोरोना संक्रमणामुळे रुबिनाला काम मिळत नव्हते. त्यात दारूड्या नवरा नशेसाठी कायम पैशांची मागणी करायचा. लाॅकडाऊनमुळे घरात जेमतेम पैसे होते. शनिवारी ६ वा. नासीर घरी आला. त्याने रुबिनाजवळ दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र तिने देण्यास नकार दिला.यावरून दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला.
हेही वाचाः- मुंबईत दिवसभरात १ हजार ११५ नवे रुग्ण, ५७ जणांचा दिवसभरात मृत्यू
कालांतराने हा वाद इतका विकोपाला गेला की, राग अनावर झालेल्या नासीरने लोखंडी राॅड रुबिनाच्या डोक्यात मारला. ऐवढ्यावरच न थांबता त्याने रुबिनाच्या अंगावर राँकेल ओतून तिला पेटवून दिले. रुबिनाने मदतीसाठी आरडा ओरडा केल्यानंतर शेजारी रुबिनाच्या मदतीसाठी धावून आले. त्यावेळी रुबिनाला तातडीने सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. या हल्यात रुबिना ३० टक्के भाजली आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी रुबिनाने दिलेल्या तक्रारीवरून ३०७ (ए),३२६ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.