Ganesh Utsav 2020 : यंदाचा बाप्पा ४ फुटांचाच, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

काही महिन्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवाची एक उज्ज्वल परंपरा महाराष्ट्रानं जपली आहे. मुंबई-पुण्यातील भव्य गणेशमूर्ती,  देखावे याचं जगाला विशेष आकर्षण आहे. ते पाहण्यासाठी ११ दिवस प्रचंड गर्दी असते. पण यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे गणेशोत्सव आपल्याला साधेपणानं साजरा करणं आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सव साजरा करताना काही निर्बंध येणार आहेत.

मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं आहे की, यावर्षी गणेशोत्सव साधेपणानं साजरा करूया. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्वाची नाही तर भक्ती महत्वाची आहे. मूर्ती ४ फुटापर्यंत असावी. महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नये. हा निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व मोठ्या गणेश मंडळाशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांशीही चर्चा केली. त्यानंतर आज त्यांनी आपला निर्णय जाहीर केला.

मुख्यमंत्री म्हणाले, 'कोरोना'मुळे प्रत्येक क्षेत्रात संकट आले आहे. त्या संकटापासून धर्म, परंपरा, संस्कृतीही सुटलेली नाही. गर्दी टाळण्यासाठी देशभरातील सर्वच प्रार्थनास्थळे बंद ठेवली आहेत, हे क्लेशदायक असले तरी मनुष्यहानी टाळण्यासाठी याशिवाय दुसरा उपाय आज नाही. निदान या वर्षी तरी आपल्याला हे सर्व टाळावं लागेल.

मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळांशी माझी चर्चा झाली. शिस्तीचे आणि सामाजिक भान ठेवून उत्सव करावा यावर एकमत झाले. गणरायांचे आगमन घरी होईल तसे सार्वजनिक उत्सवी मंडपांतही होईल. गणराय येताना महाराष्ट्रासाठी आशीर्वाद, सुरक्षा कवच घेऊनच येतील. पण भव्य मूर्तीऐवजी ४ फुटांपर्यंतच्या मूर्तीचीच मंडपात प्रतिष्ठापना व्हावी, यावर एकमत झाले आहे.

मोठ्या मूर्तीमुळे त्यांचे आगमन आणि विसर्जनप्रसंगी जास्त कार्यकर्ते लागतात. ते टाळावे लागेल. शेवटी मूर्तीची उंची नाही तर भक्ती महत्वाची आहे. मंडपात नेहमीची गर्दी नको. गणरायांचे विसर्जन कमीत कमी गर्दी, नियमांचे पालन करत होईल. मंडप देखील लहान आणि साधेच पण सुंदर असावेत याची काळजी घ्या. उत्सवास भीतीचे गालबोट लागू नये यासाठीच सार्वजनिक मंडळांशी चर्चा करून हे सर्व ठरलं आहे.


हेही वाचा

Dahi Handi Festival 2020: यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द

यंदा शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, मुंबईच्या राजाचा निर्णय

पुढील बातमी
इतर बातम्या