दहीहंडीसाठी रुग्णालयांनी कसली कंबर!

दहीहंडी आणि 15 ऑगस्ट हे दोन्ही महत्त्वाचे सण यावर्षी एकाच दिवशी आल्याकारणाने पोलीस प्रशासन आणि डॉक्टरांची सर्वात जास्त गरज पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर दुर्घटनांसाठी शहरातील महापालिका आणि सरकारी रुग्णालये देखील सज्ज झाली आहेत. केईएम, नायर आणि शीव रुग्णालयात दहिहंडीसाठी तयारी करण्यात आली आहे. दरवर्षी थरावर चढताना सरासरी 40 गोविंदा जखमी होत असल्याची नोंद आहे.

महापालिकेच्या मुख्य रुग्णालयात आपात्कालीन वॉर्डची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच प्रत्येक रुग्णालयात 10 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. केईएम रुग्णालयात जवळपास 20 डॉक्टर हे नेहमीपेक्षा अधिक असणार असल्याची माहिती महापालिका रुग्णालय प्रमुख आणि केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे.

ऑर्थोपेडिक वॉर्ड, सर्जरी वॉर्ड देखील वापरण्यात येणार आहेत. रुग्णालयांतील एक्स-रे, मेडिसीन विभागही सुरू ठेवण्यात आल्याचं डॉ. सुपे यांनी सांगितलं आहे. ऑर्थोपेडिक्स, सर्जरी विभागातील ८ डॉक्टर आणि इतर डॉक्टरांचा या टीममध्ये समावेश असेल. तसंच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गोविंदांना मोफत उपचार देणार असल्याचं केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितलं आहे. शिवाय, उपनगरांतील पालिका रुग्णालयांतही अशाच प्रकारच्या जलद वैद्यकीय सेवेचे नियोजन केले आहे, असं ही डॉ. सुपे यांनी सांगितलं आहे. याशिवाय जखमी गोविंदांना वेळोवेळी वैद्यकीय तपासणीसाठी 300 हून अधिक डॉक्टरांना नेमण्यात आले आहे.

दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर गोविंदांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या परिपत्रकाबाबत चर्चा करण्यासाठी प्रत्येक पालिका रुग्णालयांतील प्रमुखांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत प्रमुख डॉक्टरांनी आपापल्या रुग्णालयातील सर्जिकल आणि मेडिकल अतिरिक्त टिमची माहिती सादर केली. त्याचप्रमाणे अतिर्नित सुरक्षाप्रणालीसुद्धा तैनात राहणार आहे.

जे. जे. रुग्णालयात 10 खाटा गोविंदांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, असं जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितलं. शिवाय, 8 डॉक्टर्स आणि 2 मुख्य वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.


हेही वाचा

विश्वविक्रमी 'जय जवान' गोविंदा पथक!

मुंबईतील 5 प्रमुख दहीहंडी

पुढील बातमी
इतर बातम्या