Advertisement

पालिका रुग्णालयातील डॉक्टर घेणार अवयव प्रत्यारोपणाचं प्रशिक्षण


पालिका रुग्णालयातील डॉक्टर घेणार अवयव प्रत्यारोपणाचं प्रशिक्षण
SHARES

सरकारी रुग्णालयात पालिका रुग्णालयाच्या तुलनेत मेंदूमृत रुग्णांची संख्या जास्त असतानाही डॉक्टरांना मिळत नसलेल्या प्रशिक्षणामुळे अवयवदान आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अवयवदानासाठी एक चळवळ सुरू केली आहे.

याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या रुग्णालयांमध्येही अवयवदानाची चळवळ राबवण्यात येणार आहे. ज्यामुळे पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना तेथेच अवयव प्रत्यारोपण करणे शक्य होईल.

मुंबईतील पालिका रुग्णालयात अवयवदान होण्याचे प्रमाण कमी होण्याचे कारण, म्हणजे डॉक्टरांना अवयवदान प्रक्रियेबाबत नसलेले प्रशिक्षण. या डॉक्टरांना अवयवदान प्रक्रियेचे प्रशिक्षण मिळाल्यास अवयवदानाला प्रोत्साहन मिळेल या उद्देशाने केईएम रुग्णालयात ‘कॅडेव्हर लॅब’ सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि इतर सर्वसाधारण रुग्णालयांतील डॉक्टरांसाठी अवयवदानासंदर्भात प्रशिक्षण वर्ग देखील सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. केईएममध्ये सुरू करण्यात येणाऱ्या ‘कॅडेव्हर लॅब’मध्ये डॉक्टरांना बेवारस मृतदेहांवर प्रशिक्षण दिले जाईल. रुग्णाचे अवयव कसे काढायचे? कोणता अवयव कशा पद्धतीने हाताळायचा? याचे प्रशिक्षण तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जाणार आहे.

कॅडेव्हर लॅबबाबतचा प्रस्ताव नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (नोटो) ला पाठवला आहे. अन्य काही सामाजिक संस्थाच्या मदतीने ही लॅब तयार करण्यात येणार आहे. तरी हा प्रोजेक्ट सुरू व्हायला आणखी काही महिने लागतील.

डॉ. सुजाता पटवर्धन, प्रमुख, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती

एका व्यक्तीने अवयवदान केले तर, आठ जणांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शिवाय, डॉक्टरांनाही अवयवदानाच्या प्रक्रियेशी जोडले, तर याला अधिक प्रोस्ताहन मिळेल असेही डॉ. पटवर्धन यांनी सांगितले आहे.

मेंदूमृत झालेल्या रुग्णांचे अवयवदान करताना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत हे अवयव रुग्णाच्या शरीरातून काढले जातात. त्यानंतर हे अवयव सांभाळून संबंधित रुग्णालयापर्यंत पोहोचवले जातात. मात्र, हे अवयव काढण्याची प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असते. यासंदर्भात डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यासाठी केईएम रुग्णालयात कॅडेव्हर लॅब सुरू करण्याचा विचार सुरू आहे.

डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

अवयवदानाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रुग्णालयात स्वतंत्र यंत्रणेची आवश्यकता आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून मेंदूमृत झालेल्यांची नोंदणी करणे, मूत्रपिंड, यकृत, हृदय, त्वचा, डोळे यांची प्रतीक्षा यादी करणे असे काम केले जाते.

अवयवांची यादी दिवसेंदिवस वाढत असून ऑगस्ट 2016 मध्ये मुंबईत 3000 रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतिक्षेत होते. ही संख्या ऑगस्ट 2017 मध्ये 3,232 पर्यंत पोहोचली आहे. शिवाय, 2016मध्ये यकृतासाठी 156 रुग्णांना वाट पाहावी लागली होती. ती संख्या आता 240 एवढी आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाधिक लोकांनी अवयवदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे.



हेही वाचा - 

जे. जे. रुग्णालयात पहिल्यांदाच ब्रेनडेड रुग्णाचे अवयवदान

त्याच्या 'दिल'दारपणाने मिळाले दोघांना जीवनदान


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा