Advertisement

महापालिका रुग्णालयांमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर


महापालिका रुग्णालयांमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर
SHARES

महापालिका रुग्णालयाततल्या शस्त्रक्रिया कक्षांपैकी 9 शस्त्रक्रिया कक्ष आता अत्याधुनिक अशा मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहेत. प्रत्यारोपण, शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, लहान मुलांच्या दुर्धर शस्त्रक्रिया इत्यादींसाठी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर हे तुलनेने अधिक उपयुक्त मानले जाते. यात शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला जंतूसंसर्गाची शक्यता देखील तुलनेने कमी असते, अशी माहिती महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे. आर्थिक वर्ष 2017-18 च्या अर्थसंकल्पीय अंदाजात महापालिकेच्या 3 प्रमुख रुग्णालयांमधील 9 ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक अशा मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये रुपांतरीत करण्यासाठी 21 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यानुसार येत्या डिसेंबरपर्यंत केईम रुग्णालयातील 5, तर नायर रुग्णालय आणि लोकमान्य टिळक रुग्णालयातील प्रत्येकी 2 ऑपरेशन थिएटरचा कायापालट करण्यात येणार आहे.

मॉड्युलर ऑपरेशन थिएटरची वैशिष्ट्ये -

मॉड्युलर ऑपरेशन थिएटरच्या भिंती आणि छत हे एका विशिष्ट गुणवत्तेच्या स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेले असतात. तसंच यावर विशिष्ट प्रकारचा जंतूप्रतिबंधक रंग देखील असतो. हा रंग जीवाणू प्रतिबंधक आणि बुरशी प्रतिबंधक असतो. ज्यामुळे या प्रकारच्या ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला जंतूसंसर्ग होण्याची शक्यता तुलनेने कमी असते. त्यामुळे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, लहान मुलांच्या दुर्धर शस्त्रक्रिया यासारख्या जंतूसंसर्गाच्या दृष्टीने तुलनेने अधिक संवेदनशील असणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर असणे अधिक योग्य मानले जाते.

  • मॉड्युलर ऑपरेशन थिएटर हे प्री- फॅब्रिकेटेड पद्धतीचे असल्याने अत्यंत कमी कालावधीत उभारणे आणि कार्यान्वित करणे शक्य असते.
  • मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशनसाठी आवश्यक असणारे अत्याधुनिक दिवे, दरवाजे, ऑपरेशन कंट्रोल पॅनल, एक्स-रे सिस्टिम, ऑपरेशन टेबल इत्यादी सुविधा देखील असणार आहेत.
  • या थिएटरमध्ये हवा शुद्ध करणारे अत्याधुनिक यंत्र देखील असणार आहे. ज्यामुळे हवेच्या माध्यमातून होणाऱ्या संभाव्य जंतूसंसर्गाला प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे.

मुंबईतील परळ परिसरात असणाऱ्या महापालिकेच्या केईएम रुग्णालय आणि सेठ गो. सु. वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत सध्या असणारे 5 शस्त्रक्रिया कक्ष हे मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहेत. यामध्ये यूरोलॉजी, बालरोग शल्सचिकित्सा विभाग आणि प्लास्टिक सर्जरी विभागातील ऑपरेशन थिएटरचा समावेश आहे.

मुंबई सेंट्रल परिसरातील महापालिकेच्या नायर रुग्णालय आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयातील यूरोलॉजी विभागात सध्या असणारे 2 शस्त्रक्रिया कक्ष मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहेत. याचप्रमाणे शीव परिसरातील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात देखील यूरोलॉजी विभागातील 2 कक्ष मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये रुपांतरित करण्यात येणार आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा