पॉझिटिव्ह रिपोर्ट रुग्णांना सांगू नका, पालिकेच्या नियमावर मनसे नाराज

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा पाहून क्वारंटाईन केंद्रांमध्ये देखील वाढ करण्यात येत आहे. दरम्यान बुधवारी मुंबई महापालिकेनं पॉझिटिव्ह रुग्णांचा रिपोर्ट त्यांना न सांगण्याच्या सूचना चाचणी केंद्रांना दिल्या आहेत.

नव्या आदेशानुसार, रुग्णानं कोणत्याही लॅबमध्ये कोरोना टेस्ट केली, तर या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर रुग्णाला त्याबाबत माहिती न देता थेट मुंबई महापालिकेला माहिती देण्यात येईल. त्यानंतर महापालिका प्रशासन उपाययोजना करेल.

मुंबई महापालिकेनं दिलेल्या या सुचनेवरून मनसेनं नाराजी व्यक्त केली आहे. मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई म्हणाले की, 'कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळणं रुग्णाचा हक्क आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट त्याला न सांगता लॅबमधून थेट मुंबई महापालिकेकडे गेला, दोन दिवस महापालिकेकडून कोणतीही कारवाई झाली नाही, या दरम्यान रुग्णाची प्रकृती गंभीर झाली तर त्याची जबाबादारी मुंबई महापालिका घेणार का?'

'मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी काढलेला नवा आदेश अत्यंत चुकीचा आहे. कुठल्याही रुग्णाला आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की नेगेटिव्ह आला,’ हे कळण्याचा अधिकार आहे, असंही सरदेसाई म्हणाले.

मात्र  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी हा निर्णय घेण्यामागचे कारणही सांगितलं होतं. कोरोनाचा रिपोर्ट रुग्णांना दिल्यास कोणतीही लक्षणे नसलेली व्यक्ती देखील तो रिपोर्ट घेऊन खासगी रुग्णालयात दाखल होते. त्यांना खासगी रुग्णालयात गरज नसताना ऑक्सिजन आणि आयसीयू दिले जाते. त्यामुळे इतर रुग्णांना जागा मिळत नाहीत.

लक्षणे नसलेल्या लोकांना खाजगी रुग्णालये दाखल करून घेतात आणि पैसे कमावतात. त्यामुळे हा निर्णय रुग्णांच्या हितासाठीच घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. खरंच बेडची गरज ज्या रुग्णांना आहे त्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा

ठाण्यात ‘या’ ठिकाणी विशेष कोविड रुग्णालय सुरू, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबईतील १ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पुढील बातमी
इतर बातम्या