सिद्धार्थ काॅलेजला ‘मेट्रो’दुखी, भिंती-पिलरला तडे

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ च्या कामामुळे कुलाब्यापासून सीप्झपर्यंतचे रहिवाशी पुरते हैराण झाले आहेत. मशिनच्या घरघरीने जगणे अवघड झाल्याचे म्हणत कुलाब्यातील एका रहिवाशाने उच्च न्यायालयात धाव घेत मनस्तापाचा मोबदला म्हणून कुटुंबातील प्रत्येक सदस्यामागे दिवसाला १० हजार रुपयांची मागणीही केली. तर चर्चगेट, गिरगाव, मरोळ अशा अनेक ठिकाणच्या रहिवाशांनी मेट्रो हटावची हाक दिली आहे. असे असताना आता मेट्रो-३ च्या कामाची डोकेदुखी सिद्धार्थ महाविद्यालयालाही होऊ लागली आहे. 

गेल्या १५ दिवसांपासून सिद्धार्थ महाविदयालयाच्या आनंद भवन इमारतीसमोर मेट्रोच्या कामासाठी मोठे मशिन्स लावून खोदकाम सुरू करण्यात आले आहे. हे खोदकाम सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना शिकवणे तर दूर; पण एकमेकांशी समोरासमोर बोलणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवायचे कस? असा प्रश्न प्राध्यापकांसमोर निर्माण झाला आहे.

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या दोन इमारती आहेत. एक आनंद भवन आणि दुसरी बुद्धभवन. या दोन्ही इमारती १०० वर्षांहून अधिक जुन्या असून या दोन्ही इमारती हेरीटेज श्रेणीत मोडतात. अशा जुन्या आनंद भवन इमारतीला मेट्रो-३च्या कामामुळे नुकसान पोहोचत आहे. इमारतीच्या भिंतींना आणि पिलरला तडे जात असून जुन्या खांबांचा भागही निखळू लागल्याची माहिती प्राध्यापक विष्णू भंडारे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

दुर्घटना घडल्यास बाहेर पडणे अवघड

आनंद भवनला दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत. त्यातील एक प्रवेशद्वार संस्थेच्या वादात पोलिसांनी कायमस्वरूपी बंद केल्याने सध्या एकच प्रवेशद्वार सुरू आहे. असे असताना जर मेट्रो-३ च्या कामामुळे एखादी दुर्घटना घडली, तर विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना बाहेर पडणेही अवघड होईल, अशी भिती विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांकडून व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात

विद्यार्थ्यांना शिकवणे तर अवघड झालेच आहे, पण विद्यार्थ्यांची सुरक्षितताही धोक्यता आल्याने महाविद्यालयाच्या व्यवस्थापनासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहे. कारण १०० वर्षांहून अधिक जुनी इमारत असल्याने या इमारतीला हादरे बसत असल्याने दुर्घटनेची शक्यता दाट झाली आहे.

मुख्यमंत्र्यांना साकडे

गेल्या १५ दिवसांपासून ध्वनीप्रदूषण, इमारतीला हादरे आणि तडे जाणे हे सर्व त्रास सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहेच, पण जीविताचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आमचा विकासाला मुळीच विरोध नाही, पण हा विकास करताना तो योग्य प्रकारे होईल, त्याचा कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी इतकेच आमचे म्हणणे आहे. म्हणूनच आता आम्ही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहित यातून मार्ग काढण्याची मागणी केली आहे.

- डाॅ. यू. एम. म्हस्के, प्राचार्य, सिद्धार्थ महाविदयालय

काम बंद करा 

मेट्रो-३ चे काम त्वरीत बंद करा, अशी आक्रमक भूमिका सिद्धार्थमधील विद्यार्थ्यांनी घेतली आहे. त्यासाठी सह्यांची मोहीम राबवली जात असून लवकरच विद्यार्थ्यांच्या सह्याचे हे पत्र मुख्यमंत्री, मुंबई मेट्रो रेल काँर्पोरेशन, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पोलिसांन पाठवण्यात येणार असल्याचेही प्राचार्य डाँ. म्हस्के यांनी सांगितले आहे.


हेही वाचा -

एकाच तिकीटावर करा मेट्रो, मोनो अन् बसचा प्रवास

मेट्रो- ३ च्या कामाची कृपा... चर्चगेटमधील रहिवाशांना केमिकलयुक्त पाणी


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या