म्हाडाच्या लाॅटरीला महिन्याभरात थंड प्रतिसाद, डिपाॅझिटसह फक्त 20, 479 अर्ज सादर

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 819 घरांच्या लाॅटरीसीठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला सुरूवात होऊन सोमवारी एक महिना पूर्ण झाला. मात्र या महिन्याभरात म्हाडाच्या घरांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. कारण महिन्याभरात केवळ 47, 791 इच्छुकांनी नोंदणी केली आहे. तर 45, 564 नोंदणीधारकांनी अर्ज भरेल आहेत. प्रत्यक्षात मात्र महिन्याभरात केवळ अनामत रकमेसह 20, 479 अर्ज बँकेकडे सादर झाले आहेत.

गेल्या वर्षी मुंबईतील 972 घरांसाठी मुंबई मंडळाने लाॅटरी काढली होती. त्यावेळी 972 घरांसाठी अंदाजे 2 लाख इच्छुकांनी नोंदणी केली होती. तर दीड लाखांहून अधिक अर्ज भरले गेले होते तर अनामत रक्कमेसह अर्ज भरून प्रत्यक्षात लाॅटरीत 1 लाख 36 हजार 577 अर्जदार सहभागी झाले होते. असे असताना यंदा नोंदणीचा आणि अर्ज सादर करणाऱ्यांचा आकडा 1 लाखांच्या घरात तरी जातो का हाच प्रश्न निर्माण झाला आहे.

नोंदणीसाठी उरले फक्त 5 दिवस

16 सप्टेंबरपासून नोंदणीस सुरूवात झाली असून 16 आॅक्टोबर, दुपारी 3 वाजेपर्यंत 47,791 जणांनी नोंदणी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून म्हाडाच्या लाॅटरीसाठी लाखोंनी नोंदणी होत आहे. असे असताना आता नोंदणीसाठी केवळ 5 दिवस उरले आहेत. त्यामुळे हा आकडा 1 लाखांच्या घरात जाणे तर दूरच; पण 75 हजारांपर्यंत तरी जातो का? हीच शक्यता आता व्यक्त होताना दिसत आहे.

यामुळे प्रतिसाद कमी?

म्हाडाच्या लाॅटरीत दरवर्षी अत्यल्प आणि अल्प गटासाठी मोठ्या प्रमाणावर घरे असतात. तर हाच गट म्हाडाचा मुख्य ग्राहक असतो. त्यामुळे दरवर्षी लाॅटरीला याच वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळतो. यंदा मात्र हाच गट लाॅटरीतून हद्दपार झाला आहे. कारण लाॅटरीत मुख्य गट असलेल्या अत्यल्प गटासाठी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी अर्थात फक्त 8 घरे लाॅटरीत आहेत. तर अल्प गटासाठी 192 घरे आहेत, पण हा आकडाही मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्याचवेळी अल्प गटातील घरे इच्छुकांना महाग वाटत आहे. याच कारणांमुळे यंदा लाॅटरीला म्हणावा तसा प्रतिसाद दिसत नसल्याचे चित्र आहे.

किंमत मुख्य कारण?

लाॅटरीतील प्रतिसाद न मिळण्याचे दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे कोट्यवधींची घरे. यंदा पहिल्यांदाच लाॅटरीतील उच्च उत्पन्न गटातील घरांनी 1 कोटीचा आकडा पार करत पावणे दोन कोटींपर्यंत मजल मारली आहे. दोन घरांच्या किंमत पावणे दोन कोटी आहे. तर 34 घरांच्या किंमती 1 कोटी 42 लाख 93 हजार तर 168 घरांच्या किंमती 1 कोटी 39 हजार अशा आहेत. म्हणजेच 817 पैकी 204 घरांच्या किमती या कोट्यवधीच्या घरात आहेत. या किंमती एकूनच ग्राहकांन भोवळ आल्याने अर्ज भरण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचेही म्हटले जात आहे.

अर्ज सादर करण्यासाठी 9 दिवस 

आतापर्यंत 45 हजार अर्ज भरण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात केवळ 20 हजार 479 अर्ज सादर झाले आहेत. आता अर्ज भरण्यास केवळ 5 दिवस उरले असून अर्ज सादर करण्यासाठी 9 दिवस उरले आहेत. त्यामुळे यंदा बँकेत अर्ज जमा होऊन लाॅटरी सहभागी होणाऱ्या अर्जदारांचा आकडा 60 ते 75 हजाराच्या घरात राहिल अशी चर्चा आहे.

धनत्रयोदशी, पाडव्याला संख्या वाढणार?

मुंबई मंडळ प्रतिसादाबाबत समाधानी असून शेवटच्या दोन-तीन दिवसांत नोंदणीसह अर्ज सादर करण्याचा आकडा वाढेल, असा विश्वासही मुंबई मंडळाकडून व्यक्त होत आहे. त्यातही यंदा एेन दिवाळीत, पहिल्यांदाच लाॅटरीची प्रक्रिया पार पडत आहे. अशावेळी कुठल्याही शुभकामासाठी त्यातही घरासारख्या महत्त्वाच्या खरेदीसाठी धनत्रयोदशी आणि साडे तीन मुहूर्तापैकी एक पाडव्याचा शुभ मुहूर्त शुभ मानला जातो. धनत्रयोदशी आणि पाडवा तोंडावर आला असल्याने या दोन दिवसांत नोंदणीसह अर्ज भरून अर्ज सादर करण्यास मोठा प्रतिसाद मिळेल नि आकडा फुगेल, असा विश्वासही म्हाडा अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.


हेही वाचा -

'म्हाडा आमच्या कर्जाचा हप्ता भरणार का?' मालवणीतील विजेत्यांचा संतप्त सवाल 

म्हाडाचा गोलमाल! बांधकाम साहित्याची तपासणी न करता दर्जा प्रमाणपत्र


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या