फडणवीस, महाजन यांनीच तिकीट कापलं, खडसेंनी पहिल्यांदाच केला थेट आरोप

मला विधानसभेचं तिकीट नाकारून माझ्या मुलीचा पराभव घडवून आणण्यात स्वकीयांचाच हात होता. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा डाव आखला होता, असा खळबळजनक आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना पहिल्यांदाच खडसे यांनी या वरिष्ठ नेत्यांची नावं जाहीर केली. मला विधानसभेचं तिकीट देण्यात पक्षश्रेष्ठी अनुकूल असूनसुद्धा कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडण्वीसी आणि गिरीश महाजन यांनी मला तिकीट देण्यास तीव्र विरोध केल्याची माहिती मला वरिष्ठ नेत्यांनीच दिली. तिकीट कापताना त्याची समाधानकारक उत्तर मला देण्यात आली नाहीत. 

हेही वाचा- गुरूवारी खातेवाटप होणार जाहीर: अजित पवार

भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेत मी रोहिणी खडसे यांच्या पराभवाला जबाबदार नेत्यांची नावे आणि त्यासंदर्भातील पुरावे सादर केले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी मला दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. दोषींवर कारवाई होणार नसेल, तर मला वेगळा विचार करावा लागेल, असं सांगूनही अद्याप ही कारवाई झालेली नाही, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी दर्शवली.

यासंदर्भात नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बैठक करून पुन्हा माझ्याशी चर्चा करतील. नड्डा यांच्यासोबत आधी झालेल्या चर्चेबद्दल मी पूर्ण समाधानी नसलो, तर मला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. गेल्या ४० वर्षांत मी कधीही पक्षविरोधी वागलो नाही, त्यामुळे मला पक्षातून बाहेर पडण्यास प्रवृत्त करू नये, असंही मी नड्डा यांना सांगितल्याचं खडसे म्हणाले.

हेही वाचा- नाराज आमदार घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

 

पुढील बातमी
इतर बातम्या