मनसेवर सरकारची हेरगिरी? पत्रकार परिषदेत पोलिसाची घुसखोरी

मनसेच्या पत्रकार परिषदेत रेल्वेचे पोलिस हेरगिरी करत असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. एवढंच नव्हे, तर या पोलिस शिपायाबरोबर मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केल्यामुळे मनसेच्या २ कार्यकर्त्यांविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापैकी एकाचं नाव जीतू पाटील असं असून त्याच्यावर भादंवि कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

रेल्वेत अॅप्रेंटिस करणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी सोमवारी नोकरभरतीत आरक्षण वाढवून मिळावं म्हणून माटुंगा ते दादर दरम्यान ट्रॅकवर उतरून रेलरोको केला होता. त्यानंतर या प्रशिक्षणार्थींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांना मनसेचा पूर्ण पाठिंबा राहिल असं आश्वासन राज यांनी दिल्यावर मनसेचं एक शिष्टमंडळ प्रशिक्षणार्थींना घेऊन दिल्लीला गेलं. तिथं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना भेटून त्यांच्यापुढे प्रशिक्षणार्थींचं म्हणणं मांडलं. या बैठकीत रेल्वेमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं, याची माहिती देण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दादरच्या राजगड या मनसे कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं.

अखेर दिली कबुली

या पत्रकार परिषदेत दादर रेल्वे पोलिस ठाण्यातील एक शिपाई साध्या वेशात फोटो काढण्यासोबतच व्हिडिओ शुटींग देखील काढत होता. त्याच्या संशयास्पद हालचालीवर मनसे कार्यकर्त्यांना संशय आल्याने त्यांनी त्याच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी त्याने आपण औरंगाबाद इथून आलो असून प्रशिक्षणार्थी असल्याचं सांगितलं. मात्र मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करताच आपण रेल्वे पोलिस असल्याची कबुली त्याने दिली.

पोलिसांत तक्रार

यावेळी मनसे पदाधिकारी आणि पोलिस शिपाई यांच्यात धक्काबुक्कीही झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर संबंधित शिपायाने शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात जाऊन मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याचंही म्हटलं जात आहे.

दरम्यान मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क पाेलिस ठाण्याबाहेर गर्दी करून हेरगिरी करणाऱ्या पोलिस शिपायाविरोधात तक्रार नोंदवून घेण्याची मागणी केली. मात्र पोलिसांकडून लेखी तक्रार दिल्यावर चौकशी करून गुन्हा नोंदवण्यात येईल, असं मनसे पदाधिकाऱ्यांना सांगण्यात येत होतं.


हेही वाचा-

महिन्याभरापूर्वीच ठरलं, रेल्वेला द्यायचा दणका!!

अखेर प्रशिक्षणार्थींचं आंदोलन मागे, रेल्वे ट्रॅक मोकळा

म्हणून, प्रशिक्षणार्थींवर केला लाठीचार्ज- मुख्यमंत्री

Live : रेल्वे प्रशिक्षणार्थींनी घेतली राज ठाकरेंची भेट


पुढील बातमी
इतर बातम्या