दहिसरमध्ये रंगला राजशिष्टाचाराचा वाद

दहिसरमध्ये शिवसेना आणि भाजपात पुन्हा एकदा वादाची ठिणगी उडाली आहे. अर्थात ठिणगी वादाची नसून राजशिष्टाचाराची आहे. शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या प्रभागात भाजपाचे आमदार आणि खासदार हे महापालिका अधिकाऱ्यांसोबत परस्पर भेट देत आहेत. परंतु, स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे कल्पना न देता ही भेट दिल्यामुळे प्रचंड संतापल्या आहे. आमदार व खासदारांकडून प्रभागातील कामांमध्ये होणाऱ्या घुसखोरीचा तीव्र निषेध करत म्हात्रे यांनी राजशिष्टाचाराचाच मुद्दा उपस्थित केला आहे. स्थानिक नगरसेवकाला कल्पना दिल्याशिवाय सहायक आयुक्तांनी तसेच अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रभागात आमदार,खासदारांसोबत जावू नये, असाच दम भरला आहे.

सहाय्यक आयुक्तांना जाण्यास मज्जाव

दहिसरमधील प्रभाग ७ मधील स्थानिक नगरसेविका व आर-मध्य व आर-उत्तर प्रभाग समितीच्या अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी आर-उत्तरमधील सहाय्यक आयुक्तांकडे स्थानिक भाजपा आमदार मनिषा चौधरी यांच्याविरोधात तक्रार केली आहे. मनिषा चौधरी यांनी १९ मे २०१७ रोजी प्रभाग क्रमांक ७ मध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्याच्या वेळी खुद्द आर-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्यासह सेंट्रल एजन्सीचे अधिकारी उपस्थित होते. परंतु स्थानिक नगरसेवक म्हणून आपल्याला कल्पना दिली गेली नाही. त्यामुळे अशाप्रकारे स्थानिक नगरसेवकांना डावलून आमदार व खासदारांसोबत प्रभागांमध्ये भेटी दिल्या जात आहे. हे राजशिष्टाचाराला धरुन नाही. कोणत्याही आमदार व खासदाराची भेट प्रभागात असेल तर स्थानिक नगरसेवकाला याची कल्पना दिली गेली पाहिजे. त्यामुळे स्थानिक नगरसेवक नसेल तर सहायक आयुक्तांनी या भेटींसाठी जाण्यास मज्जाव केला आहे.


राजशिष्टाचाराचे उल्लंघन?

त्यामुळे आर-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी आता राजशिष्टाचाराची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. नांदेडकर यांनी गुरुवारी महापालिका चिटणीस विभागाला पत्र पाठवून सेंट्रल एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी तसेच विभागाच्या अधिकाऱ्यांनी शीतल म्हात्रे यांच्या प्रभागात त्यांना न कळवता दहिसरमधील चालू कामांची पाहणी केली ही बाब राजशिष्टाचाराच्या विरोधात आहे किंवा कसे? याची माहिती देण्याची मागणी चिटणीस विभागाकडे केली आहे.


नगरसेवकांना डावलून प्रभागांमध्ये भेटी कशाला?

आमदार व खासदार हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे. त्यांच्यासोबतही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जावे. परंतु, प्रभागांमध्ये जेव्हा हे आमदार व खासदार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन भेटी देतात, अशावेळी स्थानिक नगरसेवकांना विचारात घेतले गेले पाहिजे. त्यांना डावलून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमदार व खासदारांचे ऐकू नये. याबाबत प्रभाग समितीच्या बैठकीतही सर्वच नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानुसार आपण ही तक्रार केली होती, असे शीतल म्हात्रे यांनी 'मुंबई लाईव्ह'शी बोलताना सांगितले.


पुन्हा 'आमदार' वाद

यापूर्वीचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याशीही तत्कालीन स्थानिक नगरसेविका असलेल्या मनिषा चौधरी, शीतल मुकेश म्हात्रे आणि शीतल अशोक म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ यांचे वाद होत असत. परंतु यापैकी आता केवळ शिवसेनेच्या शीतल म्हात्रे या एकमेव निवडून आल्या असून मनिषा चौधरी या आमदार झाल्या आहेत. परंतु एकेकाळी सहकारी असलेल्या मनिषा चौधरी यांनी आपले भाजपाचे साम्राज्य पसरवण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये घुसून कामांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. दहिसर नदीचा विकास करण्याच्या मुद्यावरून आता चौधरी आणि म्हात्रे यांच्यात वाद रंगलेला पाहायला मिळत आहे.


हेही वाचा

अनधिकृत गणपत पाटील नगरच्या पाणीपुरवठ्यासाठी शिवसेना सरसावली


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या