ललिताच्या शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा पार

  • मुंबई लाइव्ह टीम & सोनाली मदने
  • समाज

बीड पोलिस दलात काॅन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या ललिता साळवेसाठी आजचा दिवस आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. कारण मुंबईतील सेंट जाॅर्ज रुग्णालयात ललिताच्या लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा शुक्रवारी सकाळी पार पडला. या शस्त्रक्रियेद्वारे ललिताला ललित म्हणून नवी ओळख मिळवता येणार आहे.

ललिताच्या शस्त्रक्रियेनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधिक्षक मधुकर गायकवाड यांनी सांगितलं की, ललिताचे कोणतेही स्त्री अवयव विकसित झाले नव्हते. तिला मासिक पाळीदेखील येत नव्हती. शुक्रवारी करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेद्वारे ललिताच्या शरीरात यूरिनेशनसाठी कृत्रिम ट्यूब बसवण्यात आली आहे.

गुंतागुंतीची मानसिकता

मनाने पुरूष पण शरीराने अविकसीत स्त्री असलेल्या ललिताला तब्बल २९ वर्षे गुंतागुंतीच्या मानसिक अवस्थेत जगावं लागलं. गावाकडे असलेल्या वैद्यकीय उपचारांची कमतरता, लैंगिक शिक्षणाचा अभाव यामुळे तिच्या जीवाची सातत्याने घालमेल व्हायची.

कुटुंबाचा पाठिंबा

अखेर घरी लग्नाचा विषय निघाल्यावर ललिताने आपली मानसिक अवस्था कुटुंबापुढे उघड केली. आपण शरीराने जरी स्त्री असलो, तरी मनाने पुरूष असल्याचं कुटुंबाला सांगितल्यावर त्यांना धक्का बसला, पण त्यांनी ललिलाता भक्कमपणे पाठिंबाही दिला.

खडतर झुंजीनंतर यश

लिंग परिवर्तनासाठी शस्त्रक्रिया करण्याकरीता सुट्टी मागणारा आणि त्यानंतरही पोलिस दलात कायम ठेवण्यात यावं अशी मागणी करणारा अर्ज पोलिस महासंचालकांना केल्यापासून ललिताची खरी झुंज सुरू झाली. पोलिस दलाकडून तिची मागणी वारंवार फेटाळण्यात येत असली, तरी तिने हार मानली नाही. उच्च न्यायालय, मॅट, राज्य सरकार सगळ्यांकडे दाद मागितली. अखेर तिला शस्त्रक्रियेसाठी परवानगी मिळाल्यावर स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा रस्ता मोकळा झाला.

पुढील शस्त्रक्रिया कधी?

प्लास्टिक सर्जन रजत कपूर यांनी यासंदर्भात सांगितलं की, ललिता तरुण असल्याने ऑपरेशनदरम्यान जास्त रक्त वाया गेलं नाही तसंच तिचा रक्तदाबसुद्धा नॉर्मल होता. ऑपरेशनच्या वेळी तिला व्हेंटिलेटरवर टाकण्यात आलं होतं. आता तिला आयसीयूमध्ये शिफ्ट केलं आहे. तिच्या संपूर्ण शरीराला भूल देऊन हे ऑपरेशन करण्यात आलं. तिचं पुढील ऑपरेशन ३ ते ६ महिन्यानंतर करण्यात येईल.


हेही वाचा-

ललिताला दर्जा पुरूषाचा की स्त्रीचा?

‘त्या’ कुमारी मातेला दिलासा! पित्याच्या नावाविना बाळाचा जन्मदाखला मिळणार


पुढील बातमी
इतर बातम्या