Advertisement

‘त्या’ कुमारी मातेला दिलासा! पित्याच्या नावाविना बाळाचा जन्मदाखला मिळणार

कुमारी मातेला दिलासा देत तिच्या बाळाला पित्याच्या नावाचा काॅलम रिकामा ठेवून जन्मदाखला देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई महापालिकेला दिले. न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

‘त्या’ कुमारी मातेला दिलासा! पित्याच्या नावाविना बाळाचा जन्मदाखला मिळणार
SHARES

बाळाच्या जन्मदाखल्यावर जन्मदात्या पित्याचं नाव देण्याची सक्ती का? असा सवाल करत मुंबईतील एका २२ वर्षीय कुमारीमातेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर या कुमारी मातेला दिलासा देत तिच्या बाळाला पित्याच्या नावाचा काॅलम रिकामा ठेवून जन्मदाखला देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई महापालिकेला दिले. न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.


काय आहे प्रकरण?

याचिकाकर्त्या कुमारी मातेने केलेल्या दाव्यानुसार तिने चुकून सदर पुरूषाचं नाव जन्मदात्याचं नाव म्हणून दिलं होतं. त्यामुळे पित्याचं नाव वगळत बाळाला जन्मदाखला द्यावा, अशी विनंती तिने मुंबई महापालिकेकडे केली होती. पण महापालिकेनं तिचा विनंती अर्ज नामंजूर करत जन्मदाखल देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली.


हमीपत्र दिल्याने प्रश्न मिटला

या याचिकेवरील याआधीच्या सुनावणीनुसार पित्याचं नाव मनाप्रमाणे काढता वा टाकता येणार नाही, असं म्हणत न्यायालयानं जन्म दाखल्यात नाव असलेल्या संबंधित पुरूषाला पुढील सुनावणीदरम्यान हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सदर पुरूष हजर राहिला आणि त्याने स्वत:चं नाव जन्मदाखल्यावरून काढून टाकण्यास हरकत नसल्याचं लेखी हमीपत्र सादर केलं.

त्यामुळे न्यायालयानं पित्याचा काॅलम रिकामा ठेवत बाळाला जन्मदाखला द्यावा, असे निर्देश महापालिकेला दिले आहेत. दरम्यान हा महत्वपूर्ण निकाल देताना उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयातील एका निकालाचा आधार घेतला आहे हे विशेष.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा