SHARE

लिंगबदलानंतरही पोलीसातील आपली नोकरी कायम रहाण्यासाठी अखेर ललिता साळवे यांना कोर्टाची पायरी चढावी लागली आहे. लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेनंतरही आपली नोकरी कायम रहावी अशी याचिका ललिताने मुंबई उच्च न्यायालयात केली असून लवकरच त्यावर सुनावणी होणार आहे.


नेमकं काय आहे प्रकरण?

ललिता साळवे या बीड पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. काही महिन्यांपूर्वी ललिता यांनी लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेसाठी सुट्टीचा अर्ज केला होता. मात्र 'तुम्हाला लिंगबदलानंतर नोकरीला मुकावं लागेल', असं पोलिस अधीक्षक कार्यालयातून त्यांना सांगण्यात आलं होतं.

ललिता या भर्ती होताना महिला म्हणून भर्ती झाल्या होत्या. पुरूषांची भर्ती ही महिलांच्या भर्तीपेक्षा कठीण असल्याचं कारण पुढे करत पोलिस खात्याने ललिता यांच्या लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेनंतर खात्यात काम करण्यावर आक्षेप घेतला होता.


मुख्यंमत्र्यांचा हस्तक्षेप

दरम्यान, हे प्रकरण प्रसारमाध्यमांनी उचलून धरल्यानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. या प्रकरणाचा पोलिस महासंचालकांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


लिंगबदलाचा निर्णय वैदयकीय तपासणीनंतरच

23 जूनला ललिता यांची जेजे रूग्णालयात हार्मोन आणि शारीरिक चाचणी घेण्यात आली. या चाचणीनंतर डॉक्टरांनी ललिता यांचा लिंग बदलण्याचा निर्णय योग्य असल्याचे कळवले. सप्टेंबर महिन्यात ललिता साळवेंनी बीडच्या पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून लिंग बदलासाठी सुट्टीचा अर्ज केला होता. मात्र महिला आणि पुरुष भर्तीचे नियम वेगळे असल्याचं कारण देत ललिता यांना नोकरी जाण्याबद्दल सांगण्यात आलं. अखेर त्यांनी यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे.संबंधित विषय
ताज्या बातम्या