उन्हाळ्यात प्रवास होणार 'कूल', बम्बार्डिअर लोकलला लवकरच ३ एसी डबे

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर आणि कूल होण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेवर धावणाऱ्या बम्बार्डिअर लोकलला एसीचे ३ डबे जोडण्यात येणार आहेत. याबाबतचा तांत्रिक व्यवहार्यता अहवाल पूर्ण करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

एसी डबे का?

मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गावर संपूर्ण वातानुकूलित गाडी चालवणं व्यवहार्य नसल्याचं लक्षात आल्याने सध्याच्या गाड्यांमध्ये बदल करून त्यांना तीन वातानुकूलित डबे जोडले जातील, अशी घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. त्यानुसार असे बदल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तांत्रिक बदल

एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) ७२ बम्बार्डिअर लोकल गाडया पश्चिम रेल्वेत दाखल झाल्या. त्यानंतर काही गाड्या मध्य रेल्वेकडे वळवण्यात आल्या. उत्तम आसनव्यवस्था आणि हवेशीर असलेल्या बम्बार्डिअर गाड्या प्रवाशांच्या पसंतीसही उतरल्या. याच गाडयांमध्ये काही बदल करण्यात येणार असल्याचं रेल्वेतील सूत्रांनी सांगितलं.

अव्यवहार्य सेवा

पश्चिम रेल्वेवर सध्या एकच वातानुकूलित लोकल धावते. यानंतर पुढील ५ वर्षांत २१० वातानुकूलित लोकल मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर दाखल करणार असल्याचंही सांगण्यात आलं. पण, वातानुकूलित गाडीचं न परवडणारे तिकीट, या गाडीकरीता सामान्य लोकलच्या रद्द कराव्या लागणाऱ्या फेऱ्या यामुळे संपूर्ण वातानुकूलित गाड्या चालवणं व्यवहार्य ठरत नसल्याचं स्पष्ट होत आहे. म्हणून, सध्या धावत असलेल्या १२ डब्यांच्या सामान्य गाड्यांनाच ३ वातानुकूलित डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

समितीची स्थापना

साध्या लोकलचे ३ डबे काढून टाकण्यात येतील आणि त्यानंतर लोकलला ३ वातानुकूलित डबे जोडले जातील. यासाठी पश्चिम, मध्य रेल्वे, एमआरव्हीसी, रेल्वे बोर्ड अधिकारी, रिसर्च डिझाईन स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन, रेल्वे सुरक्षा आयुक्तयांची एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीने याबाबतचा तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार केला आहे.

अंतिम निर्णयाची प्रतिक्षा

साध्या लोकलला ३ वातानुकूलित डबे जोडणं व्यवहार्य आहे की नाही हे अहवालात नमूद करण्यात आलं. त्यानुसार बम्बार्डिअर लोकल गाडयांमध्येच हे बदल होऊ शकतात, असं मत समितीने नोंदवल्याचं समजतं. पण, या संदर्भात रेल्वे बोर्डाने अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही.

'असे' होणार बदल

१२ डब्यांच्या साध्या लोकल गाडीला ३ वातानुकूलित डबे जोडताना सध्याचे ३ डबे काढण्यात येतील आणि त्यानंतर ३ वातानुकूलित डबे जोडले जातील. तसंच, सामान्य लोकल गाडीला वातानुकूलित डबे जोडल्यास अन्य यंत्रणा आणि सुविधांमध्येही बदल करावे लागणार आहेत. यामध्ये इंडिकेटर्स, फलाटांवर तसंच उद्घोषणांमध्येही बदल करावे लागणार आहेत.


हेही वाचा-

खूशखबर! मध्य रेल्वेकडे आली हक्काची बम्बार्डिअर!

'यूटीएस मोबाईल अॅप' आता आयफोनवरही उपलब्ध


पुढील बातमी
इतर बातम्या