धक्कादायक...मुंबई-अहमदाबाद रेल्वेलाच प्रवासी नाहीत! बुलेट ट्रेनचं काय होणार?

सुमारे एक लाख कोटी खर्च करत मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन बांधली जाणार असून या बुलेट ट्रेनवरून बराच मोठा वाद सुरू आहे. देशात-राज्यात अनेक समस्या गंभीर असताना 1 लाख कोटींचा खर्च का? बुलेट ट्रेन कशाला हवी? असा सवालही अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. असे असताना आता खरोखर बुलेट ट्रेनची गरज आहे का? याचा पुनर्विचार करायला लावणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई ते अहमदाबाद रेल्वे गाड्यांमधील 40 टक्के सीटस् तर अहमदाबाद ते मुंबई रेल्वे गाड्यांमधील 44 टक्के सीटस रिकाम्या असल्याची माहिती माहिती अधिकाराखाली उघड झाली आहे. तर त्यामुळे रेल्वेला 29 कोटी 91 लाखाचे नुकसान सहन करावे लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे बुलेट ट्रेनचा शुभारंभ ज्यादरम्यान झाला, त्या दरम्यानच्या तीन महिन्यांच्या काळातील ही आकडेवारी आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचा प्रकल्प मार्गी लावताना प्रवाशांच्या संख्येचा, सध्याच्या रेल्वेतील प्रवाशांच्या प्रतिसादाचा अभ्यास केला गेला नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर या माहितीमुळे बुलेट ट्रेन प्रकल्प आता नव्या वादात अडकण्याचीही भिती निर्माण झाली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पश्चिम रेल्वेकडे गेल्या तीन महिन्यातील मुंबई ते अहमदाबाद आणि अहमदाबाद ते मुंबई रेल्वे गाड्यांमधील प्रवासी संख्येची माहिती मागितली होती. त्यानुसार, रेल्वेने 1 जुलै 2017 ते 30 सप्टेंबर 2017 पर्यंतच्या दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यात मुंबई ते अहमदाबाद अशा 30 मेल एक्स्प्रेसने 4 लाख 41 हजार 795 प्रवाशांनी प्रवास केला. पण प्रत्यक्षात मात्र या 30 मेल, एक्स्प्रेसमधील एकूण सीट होत्या 7 लाख 6 हजार 630. म्हणजे यातील 40 टक्के सीट रिकाम्या होत्या आणि त्यामुळे रेल्वेला या तीन महिन्यात तब्बल 14 कोटी 12 लाख 83 हजार 597 रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. म्हणजेच या 30 मेल-एक्स्प्रेसमधून रेल्वेला 44 कोटी 29 लाख 8 हजार 220 रुपये इतका महसूल मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात 30 कोटी 16 लाख 24 हजार 623 इतकाच महसूल मिळाल्याचेही समोर आले आहे.

त्याचवेळी अहमदाबाद ते मुंबई रेल्वे सेवेतही रेल्वेला मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन महिन्यात अहमदाबाद ते मुंबई अशा 31 मेल, एक्स्प्रेस धावल्या असून त्यातून 3 लाख 98 हजार 2 प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रत्यक्षात या 31 रेल्वे गाड्यांमधील प्रवासी क्षमता होती 7 लाख 6 हजार 446 सीटची. या सेवेतून रेल्वेला 42 कोटी 53 लाख 11 हजार 471 रुपये इतका महसूल अपेक्षित असताना 44 टक्के सीट रिकाम्या राहिल्याने यातून केवळ 26 कोटी 74 लाख 56 हजार 982 रुपये मिळाला आहे. म्हणजेच रेल्वेचे 15 कोटी 78 हजार 489 रुपयांचे नुकसान झाले आहे.

ही आकडेवारी धक्कादायक असून निश्चितच ही आकडेवारी बुलेट ट्रेनची खरंच गरज आहे का? एक लाख कोटी खर्च करण्याची गरज आहे का? याचा विचार करायला लावणारी आहे. तर त्याचवेळी नक्कीच या सर्व गोष्टींचा कोणताही अभ्यास न करता बुलेट ट्रेनचा प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारने हाती घेतल्याचेही यावरून स्पष्ट होत आहे.

अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते

दुरांतो, शताब्दी, गुजरात मेल, भावनगर, सौराष्ट्र, विवेक, भुज, लोकशक्तीसारख्या रेल्वे गाड्यांचा यात समावेश असून यातील कित्येक गाड्या या आरामदायी आणि सुखसोयींयुक्त, जलद प्रवास देणाऱ्या आहेत. असे असतानाही या गाड्यांनाही प्रवासी मिळत नसल्याचे चित्र या आकडेवारीतून उघड झाले आहे.


हेही वाचा

१ नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक

पुढील बातमी
इतर बातम्या