एसटी कर्मचाऱ्यांना पुढची २५ वर्षे ७ वा वेतन आयोग देणं अशक्य - रावते

पगारवाढ हा एसटी कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. पण सातवा वेतन आयोग लागू करणं पुढची २५ वर्षे निव्वळ अशक्य आहे, अशा स्पष्ट शब्दांत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कर्मचारी संघटनांची मागणी फेटाळून लावली. परिवहन मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

संपामागे काँग्रेसचा हात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांना पगारवाढीचं आश्वासन दिलं. त्यासाठी समिती नेमण्याचे निर्देश दिले. तरीही एसटी कर्मचारी संघटनांनी प्रवाशांना त्रास देण्यासाठी ऐन दिवाळीत संप पुकारलाच. या संपामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोपही रावते यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

हा संप प्रामुख्याने महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस, कास्ट ट्राईब राज्य परिवहन संघटना आणि महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना अशा ५ प्रमुख संघटनांनी पुकारला आहे. इतर संघटना भलेही या संपात प्रत्यक्ष सहभागी झाल्या नसल्या, तरी त्यांनी या संपाला छुपा पाठिंबा दिला आहे.

तर, कर्मचारी तुरूंगात

प्रवासी आपला अन्नदाता आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत संप करून प्रवाशांना त्रास देणं चुकीचं आहे. या संपाने एका बाजूला प्रवाशांचे हाल होत आहेत, तर एसटी कामगार संघटनांचे नेते एसी केबिनमध्ये बसून मजा मारताहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्यास त्यांच्यावर नाईलाजाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल अधिनियमा (मेस्मा) अंतर्गत कारवाई करावी लागेल. त्यात कामगारांना तुरूंगवासही भोगावा लागू शकतो, असा इशाराही रावते यांनी दिला.

३ हजार खासगी बस रस्त्यावर

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका दिवाळीनिमित्त गावी निघालेल्या प्रवाशांना बसत आहे. अशा प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने खासगी बस, टॅक्सी, व्यावसायिक वाहनांना प्रवासी वाहतुकीची तात्पुरती परवानगी दिली आहे. आतापर्यंत ३ हजार खासगी बस रस्त्यावर उतरवण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी चिंता करून नये

सध्या अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना एसटी संपामुळे परीक्षेला जाणं जमलं नाही, त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल. या संदर्भात मी स्वतः शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली आहे.


हेही वाचा -

भाऊबीजेच्या दिवशी बेस्ट बंद; 31 हजार कर्मचारी संपावर


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या