Advertisement

खाकीवर्दीतला कवी गाजवणार साहित्य संमेलन

कधीकधी सर्वसामान्यांच्या टिकेचं लक्ष्य ठरणाऱ्या वर्दीतल्या याच 'माणसाने' गावकुसाबाहेरच्या व्यथा ओळखत त्यांना शब्दरूप दिलं आहे. या कवीचं नाव आहे. पोलिस हवालदार नंदू सावंत. मुंबई पोलिस दलात कार्यरत सावंत यांनी शेतकरी बांधवांच्या व्यथा ‘गावकुसाबाहेरचा उकिरडा’ या कवितेतून मांडल्या आहेत. सावंत यांच्या याच कवितेची निवड ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करण्यात आली आहे.

खाकीवर्दीतला कवी गाजवणार साहित्य संमेलन
SHARES

ओठांची पाकळी जेव्हा कुस्करली जाते,
तेव्हा डोळ्यांमधली लाज मरुन जाते,
अंधारलेल्या रात्रीला जेव्हा हुंदका फुटतो,
तेव्हा चुरगळलेली चादरही सुस्कारुन जाते...

कळकटलेल्या भिंतींना हे काही नवीन नाही,
करकरणारी खाट ही विटाळलेलीच, ती काही शालीन नाही,
मिनमिनणारे दिवे जेव्हा शरमेने मान खाली घालतात,
तेव्हा त्या काळोख्या खोलीचे मनही गुदमरुन जाते...

एका संवेदनशील मनाने टिपलेल्या भावना तुम्हाला विचार करायला भाग पाडतील, अन् या सिद्धहस्त लेखणीमागचं वास्तव कळाल्यावर तर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल. पोलिस म्हटलं की, खाकी वर्दीत जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर अशी प्रतिमा सर्वांसमोर उभी राहते. कधीकधी सर्वसामान्यांच्या टिकेचं लक्ष्य ठरणाऱ्या वर्दीतल्या याच 'माणसाने' गावकुसाबाहेरच्या व्यथा ओळखत त्यांना शब्दरूप दिलं आहे. या कवीचं नाव आहे. पोलिस हवालदार नंदू सावंत. मुंबई पोलिस दलात कार्यरत सावंत यांनी शेतकरी बांधवांच्या व्यथा ‘गावकुसाबाहेरचा उकिरडा’ या कवितेतून मांडल्या आहेत. सावंत यांच्या याच कवितेची निवड ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करण्यात आली आहे.



'अशी' झाली सुरूवात

मुंबई पोलिस दलातील पोर्ट झोन विभागात कार्यरत असलेले नंदू सावंत १९८७ साली पोलिस दलात दाखल झाले. लहानपणापासूनच त्यांना कविता आणि अभिनयाची आवड होती. मात्र पोलिस दलात दाखल झाल्यानंतर हे दोन्ही छंद करायला मिळतील की नाही, वरिष्ठ तसं करण्यासाठी परवानगी देतील का ? असे प्रश्न पडल्याने त्यांनी आपल्या दोन्ही छंदाना पूर्ण विराम देण्याचं ठरवलं. पण, आवड असली की सवड मिळतेच, या उक्तीनुसार पोलिस दलातील नाट्यवेड्या मित्रांची ओळख झाल्यानंतर १९९२ मध्ये पोलिस बॅनरखाली त्यांना महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. तेव्हापासून सावंत यांचा राज्य नाट्यस्पर्धेचा प्रवास सुरूच आहे.


 


अभिनयातही दमदार

आतापर्यंत सावंत यांना राज्य नाट्यस्पर्धेत उत्कृष्ट अभिनयासाठी ५ पारितोषिकं मिळालेली आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर सावंत टीव्ही सिरियलच्या माध्यमातून लोकांच्या घराघरांहीत पोहोचले आहेत. नुकतंच ‘जाडू बाई जोरात’ या सिरियलमध्ये त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका बजावत सर्वाचं लक्ष वेधून घेतलं.



'असे' वळले लेखणाकडे

अभिनय करताना सावंत यांचा लेखनाचा छंद मागे पडला. त्यांचं लेखन जवळपास बंदच झालं होतं. त्यामुळे फेसबुकवर चारोळ्यांच्या स्वरुपात पुन्हा ते लेखनाकडे वळले. नुकतीच सावंत यांची 'गावाबाहेरचा उकिरडा' ही कविता ‘कुबेर’ या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. या कवितेने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. आता सावंत यांच्या कवितेची निवड बडोदा इथं होणाऱ्या ९१ व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झाली आहे.



पोलिस दलाकडून कौतुक

त्यानुसार १७ फेब्रुवारी रोजी नंदू सावंत हे बडोद्यातील साहित्य संमेलनात ही कविता सादर करणार आहेत. पोलिस हवालदार नंदू सावंत यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबाबत मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी त्याचं कौतुक केलं आहे.



आपल्याला लाभलेल्या वरिष्ठांमुळे नोकरीसह छंद जोपासता आला. सध्याचे वरिष्ठ पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळेच हा पल्ला गाठता आला.
- नंदू सावंत, पोलिस हवालदार (पोर्ट झोन)


 
गावकुसाबाहेरचा उकिरडा

ओठांची पाकळी जेव्हा कुस्करली जाते,
तेव्हा त्या डोळ्यांमधली लाज मरुन जाते,
अंधारलेल्या रात्रीला जेव्हा हुंदका फुटतो,
तेव्हा चुरगळलेली चादरही सुस्कारुन जाते...

कळकटलेल्या भिंतींना हे काही नवीन नाही,
करकरणारी खाट ही विटाळलेलीच, ती काही शालीन नाही,
मिनमिनणारे दिवे जेव्हा शरमेने मान खाली घालतात,
तेव्हा त्या काळोख्या खोलीचे मनही गुदमरुन जाते...

खुराड्यातल्या कोंबड्यांप्रमाणे त्याही बुजलेल्या असतात,
कचाकड्याच्या त्या बाहुल्या नेहमीच सजलेल्या असतात,
अत्तराने दरवळलेली नोट जेव्हा समोर फडफडू लागते,
तेव्हा मरगळलेली नजरही कशी विस्फारुन जाते...

मग हे रोजचेच मरण ते जर्जर अंग जगत असते,
अर्धोन्मिलीत डोळ्यांनी दांभिक समाजाचे रंगढंग बघत असते,
नशेची लत जेव्हा नसानसात भिनभिनू लागते,
तेव्हा ते थकलेले मन उकिरड्याशेजारी विरुन जाते...

अशी कैक विस्कटलेली मने म्हणजे जळणार्‍या वाती,
गावकुसाबाहेरचा हा "उकिरडा" जागवत असतो कैक राती,
भेदरलेले नवे कोकरु जेव्हा काळोख्या खोलीत जमा होते,
तेव्हा बहर ओसरलेले फुल स्मृतितून विस्मरुन जाते...

- नंदू सावंत, कवी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा