अवैध शस्त्रास्त्र खटल्यातूनही सलमान सुटला!

 Jodhpur
अवैध शस्त्रास्त्र खटल्यातूनही सलमान सुटला!

मुंबई - अभिनेता सलमान खानला जोधपूर कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणातील खटल्यातून सलमान खान सुटला आहे. 18 वर्षांनी हा निकाल लागला आहे. काळवीट शिकार केसमध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सलमानविरोधात जोधपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीसाठी सलमान खान कालच जोधपूरमध्ये दाखल झाला होता. मात्र या सुनावणीवेळी न्यायाधीश कोर्टात पोहोचले, तरी सलमान पोहोचला नव्हता. त्यामुळे कोर्टाने सलमानला अर्ध्या तासाचा वेळ दिला होता. त्यादरम्यान सलमान कोर्टात पोहोचला आणि काही क्षणांत निकाल आला. या खटल्यात सलमानला संशयाचा फायदा मिळाला.

काय आहे प्रकरण?

परवाना संपलेली शस्त्र सलमानने बाळगल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच्याकडे असलेल्या दोन्ही शस्त्रांचा परवाना 22 सप्टेंबर 1998 रोजी संपला होता. मात्र त्याने या शस्त्रांनी 1 आणि 2 ऑक्टोबर 1998 रोजी काळवीटांची शिकार केली, असा आरोप याचिकाकर्त्याने केला होता.

सलमानची ही शस्त्र चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान त्याच्या हॉटेलच्या रुममध्येच ती आढळल्याचं याचिकाकर्त्याने म्हटलं होतं. शिवाय काळवीटांचा मृत्यू गोळी लागूनच झाल्याचा शवविच्छेदन अहवालही याचिकाकर्त्याने कोर्टासमोर सादर केला.

Loading Comments