तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी करणारं पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, तानाजी मालुसरे हे एक वीर योद्धा. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्या, हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा, यासाठी तो करमुक्त करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासात कोंढाणा किल्ला सर करण्याचा तानाजी मालुसरे यांचा प्रसंग ऐतिहासिक आणि विलक्षण आहे. शिवछत्रपतींचे विश्वासू सहयोगी म्हणून तानाजी मालुसरे यांनी जिवाची बाजी लावून हा महत्त्वाचा गड सर केला आणि स्वराज्यासाठी बलिदान दिले.
हेही वाचा- 'तानाजी' यूपीत टॅक्स फ्री, महाराष्ट्रात कधी?
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अधिकाधिक शिवभक्त आणि मराठीजनांपर्यंत हा चित्रपट पोहोचणे आणि या ऐतिहासिक स्मृतींचे जतन होणे अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच त्यांच्या शौर्याचे स्मरण होण्यासाठी हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी विनंती या पत्रातून मी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने करीत आहे. अन्य राज्यांनी अशाप्रकारे निर्णय घेतला असल्याने तानाजींचे कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्रात हा निर्णय त्वरेने होणे गरजेचे आहे.