Advertisement

दिग्दर्शिका कल्पना लाज्मी यांचं निधन

प्रसिद्ध चित्रकार ललिता लाज्मी यांच्या कन्या आणि निर्माते-दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या भाची असणाऱ्या कल्पना लाज्मी यांनी स्वबळावर जागतिक पातळीवर आपलं वेगळं नाव कमावलं होतं. प्रवाहाबाहेरचं आणि दुर्लक्षित घटकांवर प्रकाश टाकणारं कथानक ही कल्पना लाज्मी यांच्या सिनेमांची खासियत होती.

दिग्दर्शिका कल्पना लाज्मी यांचं निधन
SHARES

चाकोरीबाहेरचे सिनेमे बनवणाऱ्या तसंच महिलांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भावभावनांचं विश्व प्रभावीपणे मांडणाऱ्या प्रतिभावान दिग्दर्शिका-लेखिका-निर्मात्या कल्पना लाज्मी (६४) यांचं रविवारी मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं. मागील काही वर्षांपासून त्या मूत्रपिंडाच्या कर्करोगाने आजारी होत्या. कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गुरुदत्त यांच्या भाची

प्रसिद्ध चित्रकार ललिता लाज्मी यांच्या कन्या आणि निर्माते-दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या भाची असणाऱ्या कल्पना लाज्मी यांनी स्वबळावर जागतिक पातळीवर आपलं वेगळं नाव कमावलं होतं. प्रवाहाबाहेरचं आणि दुर्लक्षित घटकांवर प्रकाश टाकणारं कथानक ही कल्पना लाज्मी यांच्या सिनेमांची खासियत होती. 




दिग्दर्शनाचे धडे

ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शनाचं काम करत त्यांनी दिग्दर्शनाचे धडे गिरवले होते. सिनेमांसोबतच माहितीपटांद्वारे एखादा विषय प्रभावीपणे मांडण्यातही लाज्मी यांचा हातखंडा होता. लेखिका महाश्वेतादेवी यांच्या कथेवर आधारित असलेल्या ‘रुदाली’ या सिनेमानं त्यांची वेगळी दिग्दर्शनशैली जगासमोर आणण्याचं काम केलं.

कुठल्या सिनेमांचं दिग्दर्शन

‘दरमियां - इन बिटवीन’, ‘दमन’, ‘क्यों’, ‘चिंगारी’, ‘एक पल’ या सिनेमांसोबतच लाज्मी यांनी ‘डी.जी. मुव्ही पायोनियर’, ‘अ वर्क स्टडी इन टी प्लकींग’, ‘अलाँग द ब्रम्हपुत्रा’, ‘लोहित किनारे’ या सिनेमांचं दिग्दर्शन यशस्वीपणे केलं. 




हजारिका यांच्यावर पुस्तक

गायक डॅा. भूपेन हजारिका हे लाज्मी यांचे जवळचे मित्र होते. या मैत्रीखातरच लाज्मी यांनी हजारिका यांच्या जीवनावर ‘भूपेन हजारिका : अॅज आय न्यू हिम’ हे पुस्तक लिहिलं, पण आजारपणामुळे त्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. बेनेगलांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात लाज्मी यांच्या मनोगताची व्हिडिओ क्लीप दाखवण्यात आली होती.

त्यावेळीच त्यांच्या आजाराच्या गांभीर्याची जाणीव उपस्थितांना झाली होती. सततच्या आजारपणामुळे लाज्मी यांच्या आर्थिक तंगीची जाणीव झाल्याने आमिर खानने त्यांना उपचारासाठी आर्थिक मदतही केली होती.



हेही वाचा-

मराठमोळ्या मृण्मयीचं ‘एंड-काऊंटर’ करत बॉलिवूडमध्ये पदार्पण

आसामी ‘व्हिलेज रॅाकस्टार्स’ची आॅस्कर दरबारी वर्णी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा