Advertisement

१५ आॅगस्टला कोण फडकावणार झेंडा?

हिंदी चित्रपटसृष्टीत नेहमीच एखाद्या सणासुदीला किंवा राष्ट्रीय दिनाला मोठे चित्रपट रिलीज करत रसिकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्यामुळं यंदा स्वातंत्र्य दिनी कोणता चित्रपट बॅाक्स आॅफिसवर यशाचा झेंडा फडकवतो याची उत्सुकता आहे.

१५ आॅगस्टला कोण फडकावणार झेंडा?
SHARES

हिंदी चित्रपटसृष्टीत नेहमीच एखाद्या सणासुदीला किंवा राष्ट्रीय दिनाला मोठे चित्रपट रिलीज करत रसिकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्यामुळं यंदा स्वातंत्र्य दिनी कोणता चित्रपट बॅाक्स आॅफिसवर यशाचा झेंडा फडकवतो याची उत्सुकता आहे.


दर वर्षी १५ आॅगस्टला आपापला चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्माते-कलाकारांमध्ये चढाओढ सुरू असते. यंदा तर हा दिवस दुग्धशर्करा योग घेऊन आला आहे. स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन असा अनोखा योग एकाच दिवशी जुळून आल्यानं या दिवशी चित्रपट प्रदर्शित करून प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राष्ट्रीय आणि मानवी नातेसंबंधांचा हा सण बॅाक्स आॅफिसवर यश मिळवत साजरा करण्यासाठी यंदाच्या शर्यतीत 'साहो', 'मिशन मंगल' आणि 'बाटला हाऊस' हे तीन मोठे चित्रपट सहभागी झाले आहेत. वेबसिरीजच्या जगतातील सर्वात यशस्वी ठरलेल्या 'सेक्रेड गेम्स'चा दुसरा भागही यांच्या जोडीला आहे हे विसरता येणार नाही.

तीन चित्रपटांच्या लढतीत ३०० कोटी रुपये बजेटच्या बळावर 'साहो'नं सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. या तुलनेत 'मिशन मंगल' हा देखील कमी खर्चीक नाही. 'मिशन मंगल'प्रमाणेच 'बाटला हाऊस'च्या बजेटचा अधिकृत आकडा जरी समजू शकला नसला, तरी दोन्ही चित्रपट 'साहो'च्याच तोलामोलाचे मानले जात आहेत. फक्त हिंदीसोबतच तेलुगू आणि तमिळ या दोन दक्षिणात्य भाषेतही रिलीज होण्याचा फायदा नक्कीच 'साहो'ला होणार आहे. 'साहो' आणि 'बाटला हाऊस' हे दोन्ही चित्रपट अॅक्शन थ्रीलर आहेत, तर 'मिशन मंगल' हा इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशनमधील साइंटिस्टनं मंगळ ग्रहावर स्वारी करण्याच्या रचलेल्या इतिहासाची गाथा सांगणारा आहे. 'साहो' आणि 'मिशन मंगल' या दोन्ही चित्रपटांमध्ये अफलातून ग्राफिक्स पहायला मिळणार आहेत, तर 'साहो' आणि 'बाटला हाऊस'मध्ये धडाकेबाज अॅक्शनही आहे.

कलाकारांच्या तुलनेत तिन्ही चित्रपट तुल्यबळ भासतात. 'बाहुबली'सारखा सुपरडुपरहिट चित्रपट देणारा प्रभास 'साहो'मध्ये मुख्य भूमिकेत असल्यानं या चित्रपटाबद्दल विशेष आकर्षण आहे. या जोडीला श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॅाफ अशी हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नावंही यात आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन दक्षिणात्य दिग्दर्शक सुजीत यांनी केलं असून, एकाच वेळी हिंदी तेलुगू आणि तमीळ भाषेत प्रदर्शत होणार आहे. सध्याचा हिंदी चित्रपटसृष्टीतील हुकूमी एक्का मानला जाणारा अक्षय कुमार 'मिशन मंगल'मध्ये मुख्य भूमिकेत आहे, तर त्याच्या जोडीला विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, नित्या मेनन, किर्ती कुल्हारी, शरमन जोशी हे कलाकार आजवर कधीही न पाहिलेल्या रूपात दिसणार आहेत. दिग्दर्शक जगन शक्ती यांनी या चित्रपटात इस्रोच्या मंगळ अभियानाच्या प्रवासाची कहाणी चित्रीत केली आहे.

'बाटला हाऊस' हा देखील जरी अॅक्शन थ्रीलरपट असला तरी 'साहो'पेक्षा खूप वेगळा आहे. दिग्दर्शक निखील अडवाणी यांनी या चित्रपटात २००८ मधील आॅपरेशन बाटला हाऊस हे प्रकरण हाताळलं आहे. या चित्रपटात जॅान अब्राहम पुन्हा एकदा पोलिस अधिकाऱ्याच्या गणवेषात दिसणार आहे. त्याच्या जोडीला मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या 'सुपर ३०'मध्ये ऋतिक रोशनसोबत दिसलेल्या मृणालचं खूप कौतुक करण्यात आलं असल्यानं या चित्रपटाकडूनही खूप अपेक्षा आहेत. याशिवाय रवी किशन, मनीष चौधरी, राजेश शर्मा, सोनम अरोरा या कलाकारांनीही 'बाटला हाऊस'मध्ये विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

या तीन चित्रपटांबाबत विचार केला असता 'साहो' आणि 'बाटला हाऊस' या दोन चित्रपटांचा जॅानर जरी वेगळा असला तरी विषय खूप भिन्न असल्यानं ते एकमेकांशी क्लॅश होणार नाहीत. 'मिशन मंगल' हा देशभक्तीची भावना जागृत करणारा असल्यानं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रसिकांचा कौल या चित्रपटाला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'साहो'बात उत्सुकता आणि प्रभासचं आकर्षण या चित्रपटाला चांगला गल्ला जमवून देण्यात यशस्वी होऊ शकते असा अंदाज व्यवसायतज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. या दोन चित्रपटांच्या द्वंद्वामध्ये 'बाटला हाऊस' आपला आॅडियंस कसा खेचून आणत गल्ला जमवतो ते पहाणं उत्सुकतेचं ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

आता राहिला प्रश्न 'सेक्रेड गेम्स'चा, तर ही वेबसिरीज असल्यानं याचा प्लॅटफॅार्मच भिन्न आहे. असं असलं तरी गणेश गायतोंडेचं काय झालं? या बाबतचं कुतूहल आणि 'सेक्रेड गेम्स २'मध्ये काय पहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी दुसऱ्या भागात काय कमाली केली आहे हे देखील पहायचं आहे. 'सेक्रेड गेम्स २'च्या ट्रेलरनं उत्सुकता वाढवली आहे. 'इस बार त्रिवेदी भी नहीं बचेगा' आणि 'जंग का वक्त आ गया है' यांसारख्या संवादांनी रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. त्यामुळं यंदाच्या स्वातंत्र्य दिनी 'सेक्रेड गेम्स २'ची मोहिनीही रसिकांवर असणार हे नाकारता येणार नाही. 'सेक्रेड गेम्स २'या यशाची गणितं वेगळ्या परिमाणात मोजली जाणारी असली तरी बॅाक्स आॅफिसवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये कोणता चित्रपट यशाचा झेंडा फडकवतो ते पहायचं आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा