Advertisement

कामगार भरती परीक्षेत १ लाख ६ हजार १९३ उमेदवार उत्तीर्ण


कामगार भरती परीक्षेत १ लाख ६ हजार १९३ उमेदवार उत्तीर्ण
SHARES

मुंबई महापालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील १३८८ कामगार पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रत्येक उमेदवाराला आपल्याला मिळालेल्या गुणांची माहिती मिळाली आहे. परंतु या परीक्षेत जवळपास तीन लाख उमेदवारांपैकी केवळ १ लाख ६ हजार १९३ उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत. बाकीचे सर्व उमेदवार बाद झाले आहेत. त्यामुळे अाता उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून त्यापैकी १३८८ जणांची निवड केली जाणार आहे.


अाॅनलाइन मागवण्यात अाले अर्ज

मुंबई महापालिकेतील कामगार, कक्ष परिचर, श्रमिक, हमाल, आया व स्मशान कामगार आदी पदांसाठी १३८८ कामगारांची भरती सरळ सेवेद्वारे भरण्याचा निर्णय घेऊन ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी एकूण २ लाख ८७ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु यापैकी परीक्षेला २ लाख ४२ हजार उमेदवार बसले होते. यासर्व उमेदवारांमधून १ लाख ६ हजार १९३ उमेदवार हे उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मिळत आहे.


अंतिम उमेदवारांची यादी एप्रिलअखेरीस  

या परीक्षेमध्ये मराठीसाठी ४० गुण, इंग्रजीसाठी १० गुण, सामान्य ज्ञानासाठी २५ गुण आणि अंकगणित व तर्कज्ञान यासाठी २५ गुण अशाप्रकारे १०० गुणांची प्रश्नपत्रिका होती. यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी ५० गुणांची आवश्यकता होती. त्यामुळे या परीक्षेत १ लाख ३५ हजार ८०७ उमेदवारांना ५० गुणांपेक्षा कमी गुण मिळाल्याने ते बाद ठरले आहेत. उत्तीर्ण उमेदवारांमधून गुणांच्या आधारे यादी बनवून अंतिम १३८८ उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. ही यादी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जाहीर होणार अाहे.


अारक्षणनिहाय यादी तयार करणार

सर्व उमेदवारांनी सोडवलेली प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका तसेच त्यांना मिळालेले गुण यांची माहिती इमेल आयडीवरून देण्यात आली आहे. यासाठी ५ मार्चपर्यंत हरकती व सूचना नोंदवण्याचे कळवले होते. त्यानुसार आता सर्व उत्तीर्ण उमेदवारांची आरक्षणनिहाय यादी तयार केली जाणार आहे.

या आरक्षणनिहाय १३८८ उत्तीर्ण उमेदवारांची यादी बनवण्याचे काम एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण झाल्यानंतर या यादीतील सर्व उमेदवारांची कागदोपत्री तसेच ज्या आरक्षणातून त्याने अर्ज केला आहे, त्याची पडताळणी केली जाईल. जर मेरीटमधील उमेदवार आरक्षणानुसार तसेच शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे सादर करू शकले नाहीत किंबहुना त्यांची कागदपत्रे चुकीची असल्यास त्या उमेदवाराला बाद करून पुढील उमेदवाराचा विचार केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा