अकरा लाख मतदारांची नावं गायब, पण तक्रारी मात्र फक्त 63!

 Mumbai
अकरा लाख मतदारांची नावं गायब, पण तक्रारी मात्र फक्त 63!

मुंबई - नुकत्याच झालेल्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीत अकरा लाख मतदारांची नावे गायब झाल्याचे दावे केले जात आहेत. राजकीय नेतेमंडळीही या दाव्यांवर राजकारण करताना दिसत आहेत. मात्र असं असताना आपलं नाव मतदार यादीमध्ये नाही अशी तक्रार केवळ 63 मुंबईकरांनी केली आहे. माहिती अधिकारात ही गोष्ट उघड झाली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका निवडणूक कार्यालयाकडे 2012 आणि 2017 च्या निवडणुकीतील मतदारांची संख्या तसेच नावे गायब झाल्याबद्दल किती तक्रारी आल्या याबाबतची माहिती विचारली होती. त्यानुसार 2012 मध्ये 1 कोटी 02 लाख 86 हजार 579 अशी मतदार संख्या होती तर 2017 मध्ये 91 लाख 80 हजार 55 अशी मतदारांची संख्या होती.

यावरून 2017 च्या मतदार यादीत 1 लाख 6 हजार 24 नावांची तफावत आहे. असे असताना नाव गायब असल्याबाबत केवळ 63 अर्ज दाखल झाले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने मतदारांची नावं गायब असताना केवळ 63 अर्ज दाखल होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया गलगली यांनी दिली आहे. यावरून मतदार आपल्या मतदानाच्या हक्काबाबत जागरूक नसल्याचे यावरून स्पष्ट होत असून यापुढे तरी मतदारांनी आपले नाव यादीत आहे की नाही याबाबत जागरूक राहण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. 

दरम्यान भारत निवडणूक आयोगाकडून जी यादी आली त्याच यादीवर राज्य निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकीसाठी यादी तयार केल्याचे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाकडून याआधीच देण्यात आले आहे.

Loading Comments