Advertisement

Exclusive: तिवरांची कत्तल करणाऱ्या १५ जणांना अटक


Exclusive: तिवरांची कत्तल करणाऱ्या १५ जणांना अटक
SHARES

मालाड-मालवणी परिसरात कांदळवन क्षेत्रात तिवरांची कत्तल करत त्यावर भराव टाकत अतिक्रमण करू पाहणाऱ्या टोळीचा अखेर मुंबई कांदळवन कक्षानं पर्दाफाश केला आहे. गुरुवारी पहाटे ४ वाजता अधिकाऱ्यांनी सापळा रचत टोळीच्या म्होरक्यासह १५ जणांना अटक केल्याची माहिती मुंबई कांदळवन कक्षाचे सहाय्यक कांदळवन कक्ष अधिकारी मकरंद घोडके यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


ही कारवाई महत्त्वाची

या १५ जणांना लवकरच न्यायालयासमोर हजर करत पुढची कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच तिवरांच्या कत्तलीबाबत आणि तिवरांची कत्तल करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर लगेचंच इतकी मोठी कारवाई झाली आहे. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची आणि अशा टोळ्यांना चाप बसवणारी ठरेल असं म्हटलं जातं आहे.


१५ जणांना पकडण्यात यश

मुंबई कांदळवन कक्षाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मालाड-मालवणी परिसरात गुरुवारी मध्यरात्री २ वाजल्यापासूनच अधिकाऱ्यांनी सापळा रचला. पहाटे ४ च्या सुमारास १५ जणांना भराव टाकताना रंगेहाथ पकडण्यात अधिकाऱ्यांना यश मिळालं. तर पहाटे ४ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईदरम्यान ३ डंपर आणि इतर साहित्य ही जप्त करण्यात आल्याचही घोडके यांनी संगितलं आहे.


आणखी धागेदोरे हाती येण्याची शक्यता

ही टोळी तीवर कापत तिथं भराव टाकत अतिक्रमण करत जमीन लाटत असल्याचं यावेळी उघड झालं आहे. या टोळीचा म्होरक्या सलमान याला अटक झाल्यानं याप्रकरणी लवकरच आणखी धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे. तर यापुढं ही अशा कारवाया सुरूच राहतील आणि अशा टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या जातील असंही घोडके यांनी स्पष्ट केलं आहे. अपर प्रधान सचिव मुख्य वन संरक्षक कांदळवन कक्ष वासुदेवन, जयराम गौडा आणि विकास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर बोठे, प्रशांत देशमुख , प्रकाश चौधरी वनक्षेत्रपाल आणि टीम तसेच सुरक्षा रक्षक यांनी ही कारवाई केल्याचं घोडके यांनी सांगितलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा