Advertisement

'या' ९ जम्बो केंद्रांमध्ये होणार लहान मुलांचे लसीकरण


'या' ९ जम्बो केंद्रांमध्ये होणार लहान मुलांचे लसीकरण
SHARES

मुंबईत सोमवारपासून १५ ते १८ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. या वयोगटातील ९ लाख मुलांसाठी महापालिकेने स्वतंत्र ९ जम्बो केंद्रांमध्ये लसीकरणाची व्यवस्था केली आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रभागनिहाय केंद्रांची विभागणी करून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात हे लसीकरण पालिकेच्या सध्या सुरू असलेल्या केंद्रांमध्येच करण्यासंदर्भात विचार सुरु होता. मात्र काही जम्बो केंद्रे रिक्त असल्यामुळे मुलांचे लसीकरण या ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्य, परिवहन व शिक्षण मंडळाच्या समन्वयाने या गटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची सुरुवात केली जाणार आहे. त्या त्या प्रभागातील पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी केंद्रे विभागून दिली आहेत. 'या केंद्रांमध्ये मुलांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कोविन अॅपवर नोंदणीस सुरुवात झाली असून ऑफलाइन पद्धतीनेही लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढेल व अधिकाधिक मुलांना संसर्गापासून संरक्षण मिळेल.

पालकांना मुलांबरोबर येता येईल, मात्र संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणे अपेक्षित आहे', असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

जम्बो करोना सेंटरचे अधिष्ठाता, आरोग्य विभाग, शिक्षण व परिवहन विभागासह परिमंडळीय उपायुक्तांना त्यांच्या स्तरावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये लसीकरणासाठी आवश्यक जागा, प्रतिक्षालय, लसीकरण आणि निरीक्षण विभागाची व्यवस्था आहे. शीतसाखळी उपकरणांची सुविधा सज्ज ठेवताना लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी, लस देणारे वैद्यकीय कर्मचारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, सहकर्मचारी वर्ग, इंटनेट सुविधेची उपलब्धता तपासून पाहणे गरजेचे आहे.

लसीकरणानंतर कोणाला दुष्परिणाम जाणवल्यास त्याला तत्काळ प्रतिसाद देण्याची सुविधाही उपलब्ध करणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रातील कार्यरत मनुष्यबळाचे प्रशिक्षण करायचे असून या विभागातील लसीकरणाची जबाबदारी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.

वाहतूक सुविधा

एका कोरोना जम्बो लसीकरण केंद्रासाठी २ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरण केंद्राशी समन्वय साधण्यासाठी एका केंद्रात एका समन्वय अधिकाऱ्याची निवड करण्यात आली आहे. ज्या खासगी रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे, त्यांना निकषांचे पालन करून ती मात्रा देता येणार आहे.

शिक्षण विभागाचा माहितीत सहभाग

  • पालिका शाळांमधील २००७ वा त्यापूर्वी जन्मलेल्या विद्यार्थ्यांची यादी पुरवणे. 
  • विद्यार्थ्याचे आधारकार्ड, शाळेचे ओळखपत्र, मोबाइल क्रमांक याचा यादीत समावेश करणे आणि लसीकरणावेळी लाभार्थ्यांना ते स्वतःजवळ बाळगण्यास सांगणे. 
  • परिवहन विभागामार्फत पुरवण्यात आलेल्या वाहनांमध्ये २५ विद्यार्थ्यांना २ शिक्षक किंवा इतर जबाबदार व्यक्तींसोबत पाठवणे.
  • लसीकरण केंद्राशी समन्वय साधण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची निवड करणे

शाळा तसेच महाविद्यालयामध्ये लसीकरण करण्यासंदर्भात पालिकेचा आग्रह होता. मात्र टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी पहिल्या टप्प्यात येथे लसीकरण होऊ नये. ते पूर्णपणे डॉक्टरांच्या वैद्यकीय निगराणीखाली व्हावे, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयामध्ये या वयोगटातील पहिल्या टप्प्यामध्ये लसीकरण करण्यात येणार नाही.

ही आहेत केंद्रे

प्रभाग - लसीकरण केंद्राचे नाव - या विभागातील शाळा

  • इ - आर.सी. भायखळा केंद्र - ए, बी, सी, डी, ई
  • एफ- उत्तर - सोमय्या जबो करोना केंद्र - एफ - उ, एल -एम, पूर्व, एम- पश्चिम
  • एच- पूर्व - बीकेसी जम्बो केंद्र- एच- पूर्व, के- पूर्व, एच- प
  • पी- दक्षिण - नेस्को जम्बो केंद्र- के- पश्चिम, पी- दक्षिण
  • पी -उत्तर - मालाड केंद्र- आर- दक्षिण ,पी- उत्तर
  • आर- उत्तर- दहिसर केंद्र- आर- मध्य आर- उत्तर
  • एस- क्रॉम्प्टन अॅण्ड ग्रीव्हजस केंद्र- एन. एस
  • टी - आर. सी. मुलुंड जम्बो केंद्र- टी
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा