कोरोना व्हायरसनं आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीकरांना चांगलंच घेरलं आहे. धारावीत मंगळवारी दिवसभरात ४२ नवे रुग्ण सापडले आहेत. तसंच, ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. धारावीतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३३० झाली आहे. मृत्यूची संख्या १८ वर पोहोचली आहे.
धारावी हे मुंबईतील कोरोना व्हायरसचं हॉटस्पॉट बनलं आहे. दिवसागणिक येथील रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. धारावीत झालेल्या मृतांमध्ये ३ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. २ रुग्ण हे ६० वर्षांचे, एक रुग्ण ५५ वर्षांचा तर एक रुग्ण ४८ वर्षांचा आहे. केईएम रुग्णालयात दोघांचा, तर सायन रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला.
माहिममध्ये गेली ३ दिवस एकही रुग्ण सापडला नव्हता. परतु, मंगळवारी ५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात २ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. दोन महिला या अनुक्रमे ३५ वर्षीय आणि १६ वर्षीय आहेत. माहिम पोलीस कॉलनी, गुरुदत्त सोसायटी, इंदिरा नगर, बाळ गोविंद नगर, फिशरमॅन कॉलनीतील हे रुग्ण आहेत. त्यामुळं माहिममधील एकूण रुग्णांची संख्या ३० वर पोहोचली आहे. दादरमध्ये चार नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं दादरमधील रुग्णसंख्या ३३ वर पोहोचली आहे.