Advertisement

दादरमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

लोकार्पित करण्यात आलेले चार्जिंग स्टेशन हे सार्वजनिक वाहनतळांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेले राज्यातील पहिले ‘इ. व्ही. चार्जिंग स्टेशन’ आहे.

दादरमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
(Image: Twitter/ Aaditya Thackeray)
SHARES

दादर (पश्चिम) परिसरातील मनपा सार्वजनिक वाहनतळामध्ये उभारण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण मंगळवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. लोकार्पित करण्यात आलेले चार्जिंग स्टेशन हे सार्वजनिक वाहनतळांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेले राज्यातील पहिले ‘इ. व्ही. चार्जिंग स्टेशन’ आहे.

दादर (पश्चिम) परिसरातील प्लाझा चित्रपट गृहानजिक आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाजवळ असणाऱ्या मनपा सार्वजनिक वाहनतळातील (कोहिनूर) दुसऱ्या मजल्यावर इ. व्ही. चार्जिंग स्टेशनची सुविधा मंगळवारपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.

या लोकार्पण कार्यक्रमास आमदार सदा सरवणकर, आमदार मनिषा कायंदे, स्थानिक नगरसेविका प्रिती पाटणकर, माजी महापौर आणि नगरसेविका श्रद्धा जाधव, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह मोठ्या संख्येनं मान्यवर नागरिक उपस्थित होते.

लोकार्पित करण्यात आलेल्या चार्जिंग स्टेशनच्या ठिकाणी पार्किग आणि चार्जिग ही सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेमुळे परिसरातील नागरिकांना आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा उपलब्ध होण्यासह इलेक्ट्रिक वाहनांद्वारे प्रवास करुन मुंबई शहरात येणाऱ्या नागरिकांना देखील एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

या चार्जिंग स्टेशनमध्ये एकावेळी ७ इलेक्ट्रिक वाहनांचं चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यापैकी ४ ‘चार्जर’ हे जलद चार्जर असून, या प्रत्येक चार्जरद्वारे साधारणपणे एका तासात एक वाहन, याप्रमाणे एका तासात एकावेळी ४ वाहनं ‘चार्ज’ करता येऊ शकतात. तर, या व्यतिरिक्त ३ चार्जर हे संथ चार्जर (स्लो चार्जर) या प्रकारातील असून, याद्वारे १ वाहन चार्ज करण्यास साधारणपणे ६ तासांचा कालावधी लागतो.

या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी प्रती युनिट रुपये १५/- इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे चार्जिंग स्टेशन आठवड्याचे सातही दिवस २४ तास (24 x 7) नागरिकांच्या सुविधेसाठी कार्यरत राहणार आहेत, अशी माहिती या निमित्तानं सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा