Advertisement

चैत्यभूमीसह जांभोरी मैदानावरही अनुयायांसाठी राहण्याची सोय


चैत्यभूमीसह जांभोरी मैदानावरही अनुयायांसाठी राहण्याची सोय
SHARES

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी मुंबई महापालिकेच्यावतीने सेवा सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. पण यंदा शिवाजीपार्क चैत्यूभूमीबरोबरच वरळीतील जांभोरी मैदान आणि आंबेडकर मैदानातही निवाऱ्याची अतिरिक्त सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यासाठी आवश्यक त्या निधीची तरतूदही करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.


बैठकीदरम्यान महापौरांचे वक्तव्य

दादर (प.) येथील चैत्यभूमी स्मारक येथे आंबेडकरी अनुयायांसाठी पुरवण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवा-सुविधांबाबत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोमवारी महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात पालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, पोलीस अधिकारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी यांची संयुक्त बैठक आयोजित केली, त्यावेळी ते बोलत होते.


महापौरांनी दिले आश्वासन

महापरिनिर्वाण दिनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी, तसेच शिवाजी पार्क परिसरात विविध सेवा-सुविधा पुरवल्या जातील. सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन महापौरांच्या अध्यक्षतेखाली आणि सामाजिक संघटनांच्या सहभागातून नव्याने महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती गठीत करण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीची मुदत संपुष्टात आल्यानंतर नवीन समितीची निवड झालेली नाही. त्यामुळे याबाबत उपस्थितांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर महापौरांनी हे आश्वासन दिले.


अनुयायांसाठी अतिरिक्त निवासाची व्यवस्था

जी/उत्तर विभागातर्फे वितरीत करण्यात येणाऱ्या स्टॉलसाठी कंत्राटदारांकडून अतिरिक्त/ शुल्क आकारण्यात येते, असे सांगत सभागृह नेते यशवंत जाधव यांनी अशाप्रकारे शुल्क आकारू नये, अशी सूचना प्रशासनाला केली. त्याचप्रमाणे हे स्टॉल ७ डिसेंबरपर्यंत कायम ठेवावे, अशीही सूचना त्यांनी केली. त्याचप्रमाणे वरळीच्या जांभोरी मैदानात किंवा आंबेडकर मैदानात अनुयायांसाठी अतिरिक्त निवासाची व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. दादर स्थानकापासून वरळी स्मशानभूमीतील माता रमाई स्मृतीस्थळ आणि राजगृहापर्यंत बेस्ट‍ बसची सुविधा उपलब्ध करण्याची सूचना करून महापरिनिर्वाण दिनासाठी स्वतंत्र बजेट हेड ओपन करून पुढच्या वर्षीपासून यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची सूचना जाधव यांनी केली.



हेही वाचा

महापरिनिर्वाण दिनासाठी महापालिका सज्ज, अनेक सोयीसुविधांची तयारी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा