Advertisement

नापसंतीच्या यादीत असणारे साहेबराव गायकवाड यांचा आयुक्तांच्याच हस्ते गौरव


नापसंतीच्या यादीत असणारे साहेबराव गायकवाड यांचा आयुक्तांच्याच हस्ते गौरव
SHARES

कांदिवली आर दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तपदाची धुरा सांभाळताना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या नापसंतीच्या यादीत असलेल्या साहेबराव गायकवाड यांना महिन्याचे मानकरी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अजोय मेहता यांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अतिक्रमण विरोधी कामगिरी चोख बजावत नसल्याने गायकवाड यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे गायकवाड यांनी सेवेचा राजीनामा देण्याचाही निर्णय घेतला होता. परंतु, कांदिवलीतून भायखळा येथील 'ई' विभागात बदली झाली आणि त्याच गायकवाड यांना उत्कृष्ट कामगिरीमुळे आयुक्तांना महिन्याचा मानकरी पुरस्कार देऊन सन्मानित करावे लागले.


अतिक्रमणविरोधी ठाम भूमिका

महापालिकेच्या 'ई' विभागातील नागपाडा जंक्शन परिसराच्या सुशोभिकरणाची कार्यवाही प्रगतीपथावर नेणे, 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय' येथील पेंग्विन दर्शन इमारतीशी साधर्म्य ठेऊन केलेले परिसराचे सुशोभिकरण व आकर्षक लॅण्ड स्केपिंग यासारखे उपक्रम, अतिक्रमणांसह विविध अनधिकृत बाबींबाबत ठाम भूमिका घेऊन कार्यवाही अशा कामगिरीसाठी साहेबराव गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालायातील पेंग्विन ईमारतीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.


३२ वर्ष पालिकेची सेवा

साहेबराव गायकवाड हे ऑगस्ट १९८७ पासून महापालिकेच्या सेवेत आहेत. तर मे २०१४ पासून ते सहाय्यक आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. सुरुवातीला 'आर दक्षिण' विभागाचे सहाय्यक आयुक्त असणारे गायकवाड हे ऑक्टोबर २०१७ पासून 'ई' विभागाचे सहाय्यक आयुक्त आहेत. सध्याच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे यासह विविध अनधिकृत बाबींबाबत सातत्याने ठाम भूमिका घेत कारवाई केली आहे. त्याचबरोबर नागपाडा जंक्शनसारख्या ऐतिहासिक परिसराचे प्रस्तावित सुशोभिकरण देखील गायकवाड यांच्याच कार्यकाळात मार्गी लागले आहे. महापालिकेच्या 'ई' विभागामध्ये भायखळा, चिंचपोकळी, नागपाडा, काळाचौकी, शिवडी, रे रोड, लकडी बंदर, डॉकयार्ड रोड, भंडारवाडा, ताडवाडी, जे. जे. रुग्णालय, मुंबई सेंट्रल, आग्रीपाडा या परिसराचा समावेश होतो.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा