Advertisement

राज्यातील 'या' रेल्वे स्थानकांवरही 'रेस्टॉरेंट ऑन व्हील्स'

रेल्वे प्रवाशांना स्थानकात शाही भोजनाचा आनंद लुटता यावा यासाठी रेल्वे प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स (सीएसएमटी) स्थानकात 'रेस्टॉरेंट ऑन व्हील्स' सुरू केलं आहे.

राज्यातील 'या' रेल्वे स्थानकांवरही 'रेस्टॉरेंट ऑन व्हील्स'
SHARES

रेल्वे प्रवाशांना स्थानकात शाही भोजनाचा आनंद लुटता यावा यासाठी रेल्वे प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स (सीएसएमटी) स्थानकात 'रेस्टॉरेंट ऑन व्हील्स' सुरू केलं आहे. यासाठी रेल्वे प्रशासनानं रेल्वे गाडीच्या जुन्या कोचचा वापर केला आहे. या रेस्टॉरेंटला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. यामुळं आता  मध्य रेल्वेनं अन्य काही स्थानकांवर देखील हा प्रयोग करायचं ठरवलं आहे.

मुंबई सीएसएमटी स्थानकात ट्रेनच्या कोचमध्ये सुरु केलेल्या रेस्टॉरेंटमध्ये १० टेबलची व्यवस्था केलेली आहे. या रेस्टॉरेंटला चांगलीच पसंती मिळत आहे. आता यामुळं मध्य रेल्वे मुंबई विभागासह महाराष्ट्रातील ११ रेल्वे स्थानकांवर असा प्रयोग करणार आहे.

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्या माहितीनुसार यासाठीचं टेंडर देखील जारी करण्यात आलं आहे. नागपूरमध्ये अशा प्रकारचा रेस्टॉरेंट कोच बनवण्याचं काम सुरु देखील करण्यात आलं आहे. यासाठी ट्रेन कोच संबंधित जागेवर लावण्यात देखील आला आहे.

सीएसएमटीनंतर रेस्टॉरेंट ऑन व्हील्स मुंबईतील एलटीटी, कल्याणसह इगतपुरी, लोणावळा आणि नेरुळमध्ये सुरु होणार आहे. मुंबईसोबत नागपूर, आकुर्लीसह अन्य सहा स्थानकांवरही हे रेस्टॉरेंट सुरु होणार आहेत.

रेस्टॉरेंट ऑन व्हील्स हॉटेल सीएसएमटी स्थानकाच्या १८ नंबर प्लॅटफॉर्म समोर सुरू करण्यात आलं असून इथं बाजूलाच भारतीय रेल्वेचा इतिहास सांगणारे अनेक जुने इंजिन, जुने डबे आणि वेगवेगळ्या जुन्या मशीन ठेवण्यात आल्या आहेत.

पी डिमेलो रोडच्या बाजूलाच हे हॉटेल असल्याने येण्या जाण्यास देखील सोयीस्कर आहे. तसेच या हॉटेलमध्ये जाण्यासाठी रेल्वेची टिकीट असणे किंवा प्लॅटफॉर्म तिकीट असणे बंधनकारक नाही. त्यामुळे आपल्या रेल्वेची वाट बघत असलेल्या प्रवाशांसोबत बाहेरील नागरिक देखील या हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात.

एकूण ४० ग्राहकांची आसन क्षमता या हॉटेलमध्ये आहे. रेल्वेच्या डब्यात सुरू करण्यात आलेल्या या हॉटेलमध्ये दोन विभाग आहेत. एका विभागात आपण बसून ऑर्डर देऊन जेऊ शकतो, तर दुसरीकडे उभ्याउभ्या वडापाव, सॅंडविच, ज्यूस, सॉफ्टड्रिंक असे पदार्थ खाऊ शकतो. अशा प्रकारचे रेल्वे डब्यात सुरु झालेले हॉटेल आसनसोल स्थानकात आहे.

मध्य रल्वेच्या सीएसएमटी स्थानकात दुसरे हॉटेल सुरू करण्यात आलं आहे. या हॉटेलमध्ये आपल्याला वडापाव पासून ते पंजाबी, चायनीज आणि दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ मिळतात.

हॉटेलच्या बाजुला रेल्वे स्थानकातच मोकळी जागा असल्याने पार्किंगची समस्या देखील नाही. विकेंडला या रेस्टॉरेंटमध्ये सरासरी ४०० ग्राहक तर अन्य दिवशी २५० ते ३०० ग्राहक भेट देत असल्याची माहिती आहे. यामुळं चांगला महसूल देखील मिळत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा