Advertisement

वसईत सिमेंट कारखान्यांमुळे वाढते प्रदूषण

प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने कोणतेच नियम पाळले जात नसल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्याचा मोठा परिणाम हा नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे.

वसईत सिमेंट कारखान्यांमुळे वाढते प्रदूषण
SHARES

वसईत मुंबई (mumbai) -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत रेडिमिक्स सिमेंट कारखाने (Cement factory) उभारले आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने कोणतेच नियम पाळले जात नसल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्याचा मोठा परिणाम हा नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे.

वसई - विरार (virar) शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढू लागले आहे. याशिवाय विकासाची कामे ही या भागात वेगाने सुरू झाली आहे. त्यामुळे सिमेंट काँक्रिटीच्या रेडिमिक्सच्या मालाची मागणी ही वाढली आहे.

याच अनुषंगाने मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत विविध ठिकाणी रेडिमिक्स सिमेंट प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या कारखान्यातून दररोज अवजड वाहने, मिक्सर तसेच वाळूची वाहने ये-जा करत असतात. मात्र या प्रकल्पाचे मालक पर्यावरणाच्या दृष्टीने कोणतेच नियम पाळत नाहीत.

याशिवाय प्रदूषण रोखण्याची कोणतीच यंत्रणा नसल्याने या कारखान्यातून सतत धुळीमुळे होणारे प्रदूषण सुरूच आहे. ही सर्व धूळ थेट महामार्गावर येत असल्याने महामार्ग सुद्धा अक्षरशः सिमेंट काँक्रिटच्या धुळीने भरलेला असतो.

या धुळीमुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालक तसेच परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या वाढत्या धूळ प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता ढासळून नागरिकांच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे.

तर दुसरीकडे या महामार्गालगत हिरवागार परिसर पसरलेला आहे. मात्र या प्रकल्पातून सतत उडणाऱ्या धुळीने येथील निसर्गरम्य परिसर नष्ट होत चालला आहे. अनेक झाडांवर हे धूलिकण बसून हिरवी झाडे ही धुळीने भरली आहेत.

तसेच भात शेतीचे क्षेत्र, विविध प्रकारच्या फळझाडांचे धुळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान होत आहे असे येथील नागरिकांनी सांगितले आहे. या प्रदूषणकारी प्रकल्पांची तपासणी करून त्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

रेडिमिक्स सिमेंट कारखाने व त्यांच्या वाहतुकीमुळे प्रदूषण वाढले आहे. यामुळे हवेतील प्रदूषणात वाढ होत आहे. हे प्रदूषण (pollution) रोखण्यासाठी आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यानुसार उपाययोजना करण्याच्या सूचना प्रकल्प धारकांना केल्या आहेत.

महामार्गालगत सिमेंट कारखाने असल्याने आरएमसी वाहने विरुद्ध दिशेने प्रवास करू लागली आहे. दररोज महामार्गावर आरएमसी वाहतूक करणारी वाहने सर्वाधिक विरुद्ध दिशेने प्रवास करताना दिसून येत आहेत. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना धडक लागून अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

एकापाठोपाठ एक अशी वाहने असतात धूळ प्रदूषण इतके असते की वाहने दिसून येत नाहीत. अशा वेळी अपघात होऊ शकतात असे वाहनचालकांनी सांगितले आहे. अशा पद्धतीने धोकादायक वाहतूक करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



हेही वाचा

म्हाडाची आता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजना

ऐरोली काटई नाका रस्त्याच्या तिसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा