Advertisement

जोगेश्वरीतील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

महापालिका लवकरच 56 बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करणार आहे.

जोगेश्वरीतील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा
प्रतिकात्मक छायाचित्र
SHARES

जोगेश्वरी (jogeshwari) - विक्रोळी (vikhroli) लिंक रस्ता येथील श्यामनगर ते पश्चिम द्रुतगती महामार्गादरम्यान रस्ता रुंदीकरणाचे (Road widing) काम रखडले होते. मात्र, त्या कामातील तांत्रिक अडचणी दूर झाल्यामुळे रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

येत्या मार्च महिन्यात या कामाला सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान, रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या 56 बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच लवकरच त्या बांधकामांना नोटीस बजावण्यात येणार आहे.

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असते. भविष्यात या मार्गावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन महापालिकेने संबंधित रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.

याअंतर्गत श्यामनगर तलावापर्यंत रुंदीकरणाचे काम पूर्णही झाले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणी तसेच मेट्रोच्या (metro) विकासकामामुळे श्यामनगर ते पश्चिम द्रुतगती महामार्गादरम्यानच्या (western express highway) रस्त्याचे रुंदीकरण रखडले होते.

मात्र, महानगरपालिका आणि मेट्रो प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर रखडलेले रस्ता रुंदीकरण पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापालिका लवकरच रुंदीकरणाचे काम हाती घेणार आहे. श्यामनगर ते पश्चिम द्रुतगती महामार्गादरम्यान रस्त्याची लांबी 800 मीटर आहे. तेथे दक्षिण भागात 56 बांधकामे, तर उत्तरेकडे 96 बांधकामे बाधित होणार आहेत.

सुरुवातील दक्षिण भागातील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करण्यात येणार असून त्यासाठी 56 बांधकामांना (प्रकल्पबाधित) महापालिकेमार्फत नोटीस बजावण्यात येणार आहे. या कामाची अंतिम यादी तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून ते येत्या 20 दिवसांत पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे.

रस्ता रुंदीकरणाचे काम टप्प्या टप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच दक्षिण भागाचे काम पूर्ण झाल्यावर उत्तर भागाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

पात्र असलेल्या बाधित बांधकामांना पर्यायी जागा देण्याबाबतची प्रक्रिया सुरु असून लवकरच रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.



हेही वाचा

एका आठवड्यात आरटीईसाठी 10,000 अर्ज

मुंबईत बसेसची तीव्र टंचाई

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा