बेस्ट बसच्या (BEST bus) अपघातानंतर खबरदारी म्हणून बेस्ट (BEST) प्रशासनाने कुर्ला पश्चिम येथील बस स्थानक सध्या पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना पायपीट करत एलबीएस मार्ग गाठावे लागत आहे.
कुर्ला (kurla) पश्चिम येथे सोमवारी रात्री बेस्ट बसच्या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बेस्ट प्रशासनाने तात्काळ बस स्थानकातील असलेल्या सर्व बसगाड्या कुर्ला आगारात रवाना केल्या.
त्यामुळे मंगळवारी सकाळपासून कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील बस स्थानकातून एकही बस सोडण्यात आली नाही. कुर्ला पश्चिम येथून वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, सांताक्रुज आणि दक्षिण मुंबई परिसरात अनेक बस (best) सोडल्या जातात.
मात्र मंगळवारी सकाळपासून एकही बस या स्थानकातून सोडण्यात आली नाही. परिणामी प्रवाशांना दोन ते तीन किलोमीटर पायपीट करून कुर्ला आगार गाठावे लागले. यात प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.
बस नसल्याने आणि रिक्षांच्या अपुऱ्या संख्येमुळे कुर्ला पश्चिम परिसरातील प्रवाशांचे हाल झाले. सर्वात मोठा मनस्ताप शालेय विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिकांना सहन करावा लागला. तर कामावर जाण्यास उशीर होत असल्याने नोकरदारही संतप्त झाले होते.
हेही वाचा