Advertisement

मुंबईतील 'या' भागातील पार्किंग प्रश्न सुटणार


मुंबईतील 'या' भागातील पार्किंग प्रश्न सुटणार
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. परिणामी छोटे रस्ते व मोठ्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी होत आहे. त्यामुळं गाड्यांची वाढती संख्या आणि पार्किंगसाठी जागांची कमतरता यावर मात करण्यासाठी मुंबई महापालिकेनं बिल्डरांकडून बांधून घेतलेले वाहनतळ प्रशासनाच्या ताब्यात येणार आहेत. यापैकी पेडर रोड, भांडुप आणि अंधेरी पश्चिम या भागात पालिकेकडे हस्तांतरित झालेल्या ३ वाहनतळांमध्ये तब्बल ६०० गाड्यांचे पार्किंग होणार आहे. 


या वाहनतळांमुळे नागरिकांच्या गाड्या सुरक्षित पार्क होणार आहेतच, शिवाय पालिकेलाही कोट्यवधी रुपयांचे घसघशीत उत्पन्न मिळणार आहे.


विकास नियंत्रण नियमावली २४(१) अंतर्गत महापालिकेने शहर आणि उपनगरात इमारतींचा पुनर्विकास करताना अनेक बिल्डरांना अतिरिक्त एफएसआयचा लाभ दिला आहे. त्या बदल्यात बिल्डरांकडून बहुमजली वाहनतळ बांधून घेण्यात आले आहेत. काही भागात बिल्डरांनी वाहनतळ पालिकेला हस्तांतरित करण्यात खळखळ केली होती. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्यानंतर बिल्डर वठणीवर आले असून वाहनतळ पालिकेला हस्तांतरित केली जात आहेत. 


वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक भागात रस्त्याच्या दुतर्फा गाड्या पार्क केल्या जात असल्यानं अधिकाधिक वाहनतळ सुरू करण्याच्या प्रयत्नात पालिका आहे.

पेडर रोड, भांडुप गाव, अंधेरी पश्चिम येथे पालिकेच्या ताब्यात आलेल्या वाहनतळांमध्ये लवकरच हे पार्किंग सुरू होणार आहे. या तीनही वाहनतळांसाठी पालिकेने निविदा मागवल्या असून त्या अंतिम प्रशासकीय प्रक्रियेत आहेत. 


पेडर रोड इथं भुलाभाई देसाई मार्गावर मुंबईतील पहिला रोबोटिक २१ मजली वाहनतळ २०१२ साली बांधून पूर्ण झाला. मात्र बिल्डरने वाहनतळाचा व्यावसायिक वापर सुरू केल्याचे पालिकेच्या लक्षात आल्यानंतर तो ताब्यात घेण्यात आला आहे. अनेक वर्षे विनावापर पडल्याने तब्बल दहा कोटी रुपये खर्चून त्याची तांत्रिक दुरुस्ती करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी या वाहनतळाचे उद्घाटन करण्यात आले.


भांडुपमधील एस. सॅम्युअल रोड हा एलबीएस मार्ग आणि पूर्व मुक्त मार्गाला जोडणारा आहे. मुलुंड आणि नाहूरपासून जवळ असलेल्या या परिसरात वाहनतळाची सोय नव्हती. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने हे वाहनतळ विकसित केला आहे. अंधेरी पश्चिम तसेच वर्सोवा परिसरात पालिकेचे वाहनतळ आहेत. मात्र जुहू, विलेपार्ले पश्चिम आणि अंधेरीचा वाढता विकास व या भागातील वाहतुकीची वर्दळ पाहून हे वाहनतळ उपयुक्त ठरणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. 




भुलाभाई देसाई मार्ग, पेडर रोड

वाहने : २४०

कंत्राट कालावधी : ३ वर्ष

पालिकेचे उत्पन्न : ३ कोटी ७० लाख

एस. सॅम्युअल रोड, भांडुप पश्चिम

वाहने : हलकी वाहने २५५

जड वाहने : ३५

एकूण : २९०

कंत्राट कालावधी : ५ वर्ष

पालिकेचे उत्पन्न : ४ कोटी ५० लाख

शबनम बिल्डिंग, ९० फूट रोड, अंधेरी पश्चिम

वाहने : ५५

कंत्राट कालावधी : २ वर्ष

पालिकेचे उत्पन्न : १५ लाख ६६ हजार

एकूण पार्किंग क्षमता : ६०० गाड्या

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा