प्रामाणिक रिक्षाचालकाने केली बॅग परत

 Govandi
प्रामाणिक रिक्षाचालकाने केली बॅग परत

अनेकदा आपले हरवलेले सामान आपल्याला परत मिळवताना दमछाक होते. पोलीस ठाण्याचे खेटे मारूनही ते परत मिळत नाही. आजच्या काळात प्रामाणिकपणा क्वचितच पाहायला मिळतो. अंधेरीतल्या एका रिक्षाचालकानेही असाच प्रामाणिकपणा दाखवला आहे. त्याच्या रिक्षात एका प्रवाशाची विसरलेली बॅग त्याने पोलिसांच्या स्वाधीन केली. त्यामुळे झोन सहाच्या उपायुक्तांनी या रिक्षाचालकाचा सत्कार केला. 

अशितोष शुक्ला असे या रिक्षा चालकाचे नाव असून शुक्रवारी त्याला ही बॅग त्याच्या रिक्षात आढळून आली होती. अंधेरी येथून जगन्नाथ रमनन हा प्रवाशी त्यांच्या रिक्षात बसला होता. गोवंडी परिसरात या प्रवाशाला सोडल्यानंतर त्याची बॅग रिक्षातच राहिली होती. तशी तक्रार या प्रवाशाने गोवंडी पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार पोलीस या रिक्षाचा शोध घेत असतानाच शनिवारी सकाळी हा रिक्षाचालक बॅग घेऊन पोलीस ठाण्यात आला. पोलिसांनी तत्काळ प्रवाशाला पोलीस ठाण्यात बोलावून त्याला ही बॅग परत केली. या बॅगेमध्ये एक लॅपटॉप आणि काही महत्त्वाची कागदपत्रे होती. प्रवाशाला ही बॅग परत मिळाल्याने त्याने देखील या इमानदार रिक्षाचालकाचे आभार मानले. शिवाय पोलीस उपायुक्त शहाजी उपाम यांनी देखील या रिक्षा चालकाला प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार केला आहे.

Loading Comments