बीडीडीवासियांचा विरोध अखेर मावळला


बीडीडीवासियांचा विरोध अखेर मावळला
SHARES

मुंबई - म्हाडाचे काम दर्जाहीन आहे, म्हाडावर आपला विश्वास नाही असे म्हणत म्हाडाला बीडीडी वासियांनी जोरदार विरोध केला आहे. पण आता ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी वासियांचा विरोध अखेर मावळला असल्याची माहिती बीडीडी चाळ उपक्रम सेवा समितीचे सचिव कृष्णकांत नलगे यांनी दिली आहे.

या दोन्ही ठिकाणच्या पुनर्विकासासाठी निविदा अंतिम केल्या असून, लवकरच कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. मात्र या पुनर्विकासाला, त्यातही म्हाडाकडून पुनर्विकास करण्याला राहिवाशांचा विरोध आहे. वरळीतील बीडीडी वासियांनी तर थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. असे असताना पुनर्विकास योग्य प्रकारे मार्गी लावण्याकरता बीडीडी वासीयांचे मन वळवत त्यांचा विरोध दूर करण्याचे आव्हान म्हाडासमोर होते. हे आव्हान अखेर म्हाडाने यशस्वीरित्या पेलले आहे.

बीडीडी वासियांची मने वळवण्यासाठी सोमवारी रात्री म्हाडाने ललित कला भवन, ना. म. जोशी मार्ग येथे एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत म्हाडाने सादरीकरण करत प्रकल्पाची माहिती दिली. तर बीडीडी वासियांना पुनर्विकासात काय मिळणार? याची माहिती या सादरीकरणाद्वारे आकर्षकरीत्या मांडण्यात आली. या सादरीकरणानंतर अगदी काही मिनिटांतच बीडीडी वासियांचा विरोध मावळला. हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावला जावा अशी मागणी यावेळी म्हाडाकडे बीडीडीवासियांनी केल्याचंही नलगे यांनी सांगितलं. पण इतक्या वर्षांचा विरोध एका तासात कसा मावळला? असा प्रश्न मात्र सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

संबंधित विषय