SHARE

शिवसेना आणि आदेश बांदेकर यांना महापालिका आयुक्तांनी मोठा झटका दिला. गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर चौकशी सुरू असतानाच महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बृहन्मुंबई ललित कला आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी (सीईओ) विलास वैद्य यांची उचलबांगडी करून नवीन अधिकाऱ्याची नेमणूक केली. प्रतिष्ठानच्या चौकशीत व्यवस्थापकीय विश्वस्त आदेश बांदेकर आणि वैद्य यांच्या मनमानी कारभाराचे पुरावेच समोर आल्यामुळे ही कार्यवाही करून सेनेच्या वर्चस्वालाच धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

अंधेरी क्रीडा संकुल आणि मुलुंडमधील कालिदास नाट्यगृह- तरण तलाव आदींचा कारभार सांभाळणाऱ्या बृहन्मुंबई ललित कला आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या कारभाराबाबत भाजपाचे स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे आणि भाजपा गटनेते मनोज कोटक यांची आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यामुळे प्रतिष्ठानमधील भ्रष्टाचार आणि गैरकारभाराची चौकशी समिती आयुक्तांनी नेमली आहे. उपायुक्त राम धस आणि सुधीर नाईक यांची समिती याची चौकशी करत आहे.

बृहन्मुंबई ललित कला आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी आदेश बांदेकर आहेत, तर मुख्य प्रशासकीय अधिकारीपदी विलास वैद्य होते. परंतु, उप लेखापाल (शिक्षण) राजेंद्र पवार यांची आता या प्रतिष्ठानच्या मुख्य प्रशासकीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी याला दुजोरा देऊन राजेंद्र पवार यांची सीईओ म्हणून नियुक्ती केल्याचे सांगितले. या प्रतिष्ठानचे अध्यक्ष हे महापौर असून त्यांना विश्वासात न घेता या पदावर अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. वैद्य यांना पदावर ठेवून चौकशी करणे योग्य नसल्यामुळे त्यांच्या जागी अन्य अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या दिवसात आदेश बांदेकर यांचीही हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या