Advertisement

मुंबईत पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाई कामाला सुरुवात


मुंबईत पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाई कामाला सुरुवात
SHARES

दरवर्षी मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबई तुंबते. मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचून रस्ते वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळं महापालिका पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नदी व मोठ्या नाल्यांची साफसफाई करते. मात्र, येत्या पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाई कामांना यंदा फेब्रुवारी अखेर सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी १५२.२५ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. 

या संबंधित स्थायी समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने व्हावा, यासाठी मुंबई महानगरपालिका विविध स्तरीय उपाययोजना सातत्याने अंमलात आणत असते. याच अंतर्गत महापालिका क्षेत्रातील मिठी नदीसह मोठ्या नाल्यांची साफसफाई महापालिकेद्वारे नियमितपणे करण्यात येत असते. मोठ्या नाल्यांची साफसफाई करताना साधारणपणे पावसाळ्यापूर्वी ७५ टक्के, पावसाळ्यादरम्यान १५ टक्के आणि पावसाळ्यानंतर १० टक्के याप्रमाणे कामे केली जातात.

महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिका क्षेत्रातील शहर भागात अंदाजे ३२ किमी लांबीचे मोठे नाले आहेत. यांच्या साफसफाईसाठी रुपये १२.१९ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.

तर पूर्व उपनगर भागात असणाऱ्या मोठ्या नाल्यांची सुमारे १०० कि.मी असून यांच्या साफसफाईसाठी रुपये २१.०३ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. पश्चिम उपनगरांमध्ये असणाऱ्या सुमारे १४० किमी लांबीच्या मोठ्या नाल्यांच्या साफसफाईकरिता रुपये २९.३७ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे.

मुंबई, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर या तिन्ही भागातून वाहणाऱ्या सुमारे २० कि.मी. लांबीच्या मिठी नदीच्या सफाई कामांबाबत मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी रुपये ८९.७७ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. मिठी नदीची साफसफाई करताना गाळाच्या एकूण परिमाणाच्या ८० टक्के साफसफाई ही पावसाळ्यापूर्वी करण्यात येते. तर उर्वरित २० टक्के साफसफाई ही पावसाळ्यानंतर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याद्वारे देण्यात आली आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा